पिंपरी l प्रतिनिधी
पेट्रोल पंपावर जमा झालेली कॅश दोघेजण बँकेत जमा करण्यासाठी जात होते. त्यांना रस्त्यात अडवून दोघांनी लुटले. यामध्ये दोघांनी 10 लाख 97 हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी अकरा वाजता पुणे नाशिक महामार्गावर एकतानगर येथे घडली.
शिवानी गणेश मगर (वय 24, रा. कसबापेठ, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि वेदप्रकाश दुबे असे दोघेजण सोमवारी सकाळी अकरा वाजता सुमन पेट्रोल पंपावर जमा झालेली कॅश बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते एकतानगर येथे आले असता एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादी यांना अडवले. त्यांच्याकडील 10 लाख 97 हजार 480 रुपये रोख रक्कम, डिपॉझिट करण्याचे तीन चेक जबरदस्तीने चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.