TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत पहिल्यांदाच होणार ‘गोल्डन जॅकल’चे सर्वेक्षण

मुंबई : सोनेरी कोल्हा (गोल्डन जॅकल) कांदळवन परिसंस्थेतील प्रमुख सस्तन प्राणी असून त्यावर अद्याप नियोजनबद्ध सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे सोनेरी कोल्ह्यांची संख्या, माहिती तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहे. आता मुंबई महानगरातील कांदळवन परिसरात आढळणाऱ्या सोनेरी कोल्ह्याचे वास्तव्य, त्याचे खाद्य, दैनंदिन जीवनाचा अभ्यास करण्यात येणार आहे. कांदळवन प्रतिष्ठान आणि खासगी संस्था साधारण पाच महिन्यांमध्ये हा अभ्यास करणार आहे.

मुंबईचा पश्चिम किनारा, मध्य मुंबईत, नवी मुंबईतील काही भाग आणि ठाणे खाडीच्या आसपास असलेल्या कांदळवनामुळे जैवविविधतेला मोठ्या प्रमाणावर आधार मिळाला आहे. कांदळवनामुळे स्थलांतरित पक्षी, वेगवेगळे वन्यप्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीव आढळून येतात. त्यापैकी प्रामुख्याने सोनेरी कोल्हा दृ्टीस पडतो. कांदळवनाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती असल्याने सोनेरी कोल्ह्यासाठी मुंबईतील कांदळवन हा एक असुरक्षित अधिवास आहे. त्यांचा अधिवास कमी होत असल्याने त्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. अनेक वेळा विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली, ऐरोली येथील मानवी वस्तीत सोनेरी कोल्हा शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. सोनेरी कोल्हांचे सर्वेक्षण करण्याची मागणी अनेक वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी केली होती. त्यामुळे मुंबई महानगरात दिसणाऱ्या सोनेरी कोल्ह्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कांदळवन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई महानगरातील सोनेरी कोल्ह्यांविषयी खूप कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करण्यासाठी साधारण पाच महिन्यांच्या कालावधीत इत्यंभूत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोनेरी कोल्ह्याचे पर्यावरणशास्त्रीय महत्त्व समजून घेऊन, कांदळवनातील त्याचा वावर कुठे आहे, त्याचे खाद्य काय आहे, याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. यांचा अभ्यास करण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. स्थानिक रहिवासी आणि मच्छिमारांशी संवाद साधून त्यांचे सोनेरी कोल्ह्याविषयीचे अनुभव जाणून घेण्यात येणार आहेत. साधारण फेब्रुवारी २०२३ पर्यंत हे संशोधन पूर्ण होण्याची अपेक्षा असून या संशोधनासाठी सुमारे ७ लाख ७२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

मुंबई महानगरात पहिल्यांदाच सोनेरी कोल्ह्यांवर संशोधन केले जाणार आहे. कांदळवन भागात सोनेरी कोल्ह्याचा अधिवास असल्याने त्यांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. या संशोधन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच, मुंबई महानगरात सोनेरी कोल्ह्यांची संख्या, त्यांचा अधिवास याबाबतची माहिती समोर येईल. – वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष

कांदळवन प्रतिष्ठानला या अभ्यासामुळे मुंबई महानगरातील कांदळवन परिसर आणि आजूबाजूच्या भागातील सोनेरी कोल्ह्यांची माहिती मिळण्यास मदत होईल. अनेक वर्षांपासून मुंबई महानगरात कांदळवनाच्या भागात कोल्हे आढळून आले आहेत. मात्र, त्यांच्या ठिकाणांचा, भ्रमंती मार्गांचा कोणताही पद्धतशीर अभ्यास झालेला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच सोनेरी कोल्ह्यांवर अभ्यास केला जात असून नवीन माहिती उपलब्ध होईल. – डॉ. मानस मांजरेकर, उपसंचालक, संशोधन आणि क्षमता बांधणी, कांदळवन प्रतिष्ठान

सोनेरी कोल्हा (कॅनिस ऑरियस) युरोप, आफ्रिका, आशियाच्या काही भागात आढळतो. मुंबईत खाडीलगत, कांदळवनात सोनेरी कोल्हा दिसतो. सोनेरी कोल्हा हा वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची तीन अंतर्गत संरक्षित आहे. तसेच, सध्या देशात सोनेरी कोल्हा संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button