TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

राज्याची शालेय शिक्षणस्थिती देशात सर्वोत्तम ; शैक्षणिक कामगिरी श्रेणी निर्देशांकानुसार पहिले स्थान

मुंबई : करोनाच्या संसर्गामुळे जवळपास संपूर्ण वर्ष शाळा बंद असलेल्या २०२०-२१ या वर्षांत राज्य हे शालेय शिक्षणिक स्थितीच्या प्रतवारीत सर्वोत्तम ठरले. महाराष्ट्राप्रमाणेच केरळ आणि पंजाबही हजारपैकी ९२८ गुण मिळवून प्रथम स्थानी आहे.

केंद्रीय शिक्षण विभागाकडून दरवर्षी अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रवेश, समन्याय आणि प्रशासकीय कार्यप्रणाली अशा पाच निकषांनुसार राज्यांची शालेय शिक्षणाची प्रतवारी (परफॉर्मन्स ग्रेिडग इंडेक्स) जाहीर करण्यात येते. यातील सर्व निकषांमध्ये मिळून ७० मापदंड निश्चित करण्यात आले. त्यासाठी केंद्राच्या विविध योजनांच्या संकेतस्थळावर शाळांनी नोंदवलेली माहिती विचारात घेण्यात येते. यापूर्वीच्या म्हणजे २०१९-२० या शैक्षणिक वर्षांतील प्रतवारीनुसार राज्याला देशात आठवा क्रमांक होता. मात्र २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत राज्याची ५९ गुणांची वाढ झाली. पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कार्यप्रणाली या दोन निकषांमध्ये राज्याची कामगिरी सुधारल्याचे दिसते.

अध्ययन निष्पत्तीत सुधारणा नाही

प्रतवारी निश्चित करण्यासाठी असलेल्या निकषांमध्ये अध्ययन, अध्यापन प्रक्रियेशी थेट निगडित असलेला निकष म्हणजे अध्ययन निष्पत्ती. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची इयत्ता आणि त्याने आत्मसात करणे आवश्यक असलेली कौशल्ये या अनुषंगाने अध्ययन निष्पत्तीचे निकष निश्चित केले आहेत. अध्ययन निष्पत्तीसाठी राज्याला २०१९-२० च्या अहवालानुसार १४४ गुण मिळाले होते.  गुरुवारी जाहीर झालेल्या २०२०-२१ च्या अहवालानुसार या गुणांमध्ये काहीही फरक पडलेला नाही.

शाळा बंद तरीही..

करोनाच्या साथीमुळे राज्यातील शाळा या २०२०-२१ या संपूर्ण वर्षांत बंदच होत्या. प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनाऐवजी ऑनलाइन अध्यापन, आभासी वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सुविधांची वानवा राज्यातील दुर्गम भागासह अगदी शहरी, निमशहरी भागांतही जाणवली. नेमकी किती मुले शिक्षण प्रवाहात नाहीत याचाही नेमका अंदाज घेता येत नव्हता. श्रेणी निर्देशांकानुसार २०२०-२१ या वर्षांतील शालेय प्रवेश किंवा शिक्षणाची उपलब्धता या निकषासाठीचे गुण हे २०१९-२० प्रमाणेच म्हणजे ७६ आहेत. शाळा बंद असलेल्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत पायाभूत सुविधा या निकषासाठीचे १७ गुण तर, प्रशासकीय कार्यप्रणाली या निकषासाठी ४१ गुण वाढले आहेत. समन्याय या निकषासाठी १ गुण अधिक मिळाला आहे.

राज्याचे निकषांनुसार गुण

                  २०१९-२०      २०२०-२१

अध्ययन निष्पत्ती        १४४          १४४

शाळा प्रवेश            ७६           ७६

पायाभूत सुविधा        १२६           १४३

समन्याय              २२४          २२५

प्रशासकीय कार्यप्रणाली    २९९          ३४०

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button