Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

केंद्रीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पाऊले, आपत्ती दलाच्या १५ तुकड्या तैनात

मुंबई : केंद्रीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात केल्याची माहिती देण्यात आली. यात एनडीआरएफच्या १३ आणि एसडीआरएफच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त राज्यात विविध ठिकाणी या दोन्ही दलांच्या नऊ कायमस्वरूपी तुकड्या तैनात केल्या आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

केंद्रीय हवामान खात्याकडून ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यात विशेष करून कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्य सकारने विविध ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १५४.८९ मिमी पावसाची नोंद झाली. सद्यस्थितीत पूरस्थिती नाही, मात्र खेड येथील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे व वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. दरडप्रवण व पूरप्रवण भागातील १५२ कुटुंबे म्हणजे ४७९ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन घरे जमीनदोस्त झाली. ६७ घरांचे अंशतः नुकसान झाले. एकूण ५१ गावे बाधित झाली आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सिंधुदुर्गात १४ घरांचे नुकसान

गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५५ मिमी पावसाची नोंद झाली. कुठेही पूरस्थिती नसल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात एका घराचे पूर्णतः, तर १४ घरांचे अंशतः नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून रायगडमध्ये एक एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.

अशा तुकड्या तैनात

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत कांजुरमार्ग आणि घाटकोपर येथे दोन एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय पालघर येथे एक, रायगड-महाड येथे दोन, ठाण्यात दोन, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये दोन, कोल्हापूरमध्ये दोन, साताऱ्यात एक, सिंधुदुर्ग येथे एक अशी १३ पथके राज्यभरात तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय नांदेड आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. मुंबईत तीन, पुण्यात एक, नागपुरात एक अशा एकूण पाच एनडीआरएफच्या, तर धुळे येथे दोन, नागपुरात दोन अशा चार एसडीआरएफच्या कायमस्वरूपी तुकड्या तैनात केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button