ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शेतकऱ्यांचा मोबदला देण्याचा प्रश्न राज्य सरकारने लटकवला – लक्ष्मण जगताप

पिंपरी चिंचवड | महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण करूनही प्राधिकरणासाठी जमीनी दिलेल्या मूळ शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा प्रश्न मार्गी लागताना दिसत नाही. याप्रकरणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचना उपस्थित केली होती. त्याला नगरविकास राज्यमंत्र्यांनी आत्ता लेखी उत्तर दिले असून, त्यात जमिनीच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने तपासून कार्यवाही करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे म्हटले आहे.

त्यावर हे सरकार प्रत्येक गोष्ट नुसतेच विचाराधीन ठेवत असल्याची टीका जगताप यांनी केली. प्राधिकरणाची 1972 मध्ये स्थापना झाली. त्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील भूमीपूत्र शेतकऱ्यांच्या जागांचे संपादन झाले. त्या मोबदल्यात बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याचा 15 सप्टेंबर 1993 रोजी निर्णय झाला. मात्र तो 1984 नंतरच्या जमीन संपादनासाठीच लागू करण्यात आला. हा निर्णय 1972 ते 1983 दरम्यान जमीन संपादन झालेल्या शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक होता. हे बाधित शेतकरी साडेबारा टक्के जमीन परतावा मिळावा म्हणून चार दशकांपासून न्याय हक्काची मागणी करत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 1972 ते 1983 दरम्यानच्या प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांनाही न्याय देण्याचा निर्णय घेतला गेला.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत साडेबाराऐवजी 6.2 टक्के जमीन देण्याचा झाला होता निर्णय!

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी 1 जुलै 2019 रोजी बैठक घेतली होती. साडेबारा टक्के जमीन परतावा देण्यासाठी प्राधिकरणाकडे पुरेशी जमीन उपलब्ध नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मध्यममार्ग काढत बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित क्षेत्राच्या 6.2 टक्के एवढी जमीन आणि 2 चटई एवढा निर्देशांक मंजूर करण्याचा निर्णय बैठकीत घेतला होता. त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारने प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत काढलेल्या मध्यममार्गानुसार कार्यवाही करणे अपेक्षित होते. परंतु, आजतागायत तसे झालेले नाही. उलट महाविकास आघाडी सरकारने शहराचा विरोध असतानाही प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण केले.

विलीनीकरण करतानाच मूळ शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याचा निर्णय झाला असता तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला असता. परंतु महाविकास आघाडी सरकारने स्थानिक भूमीपूत्र शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्याचा प्रश्न तसाच लटकवत ठेवला आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचना मांडून झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कपात सूचनेला नगरविकास विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आत्ता लेखी उत्तर पाठवले आहे.

त्यामध्ये त्यांनी प्राधिकरणाने भूसंपादन केलेल्या 106 मूळ शेतकऱ्यांना मोबदला म्हणून संपादित क्षेत्राच्या 6.2 टक्के एवढी जमीन देण्यासाठी 26 हेक्टरपेक्षा अधिक जमीन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. जमिनीच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने तपासून याबाबत कार्यवाही करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री तनपुरे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button