breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीच्या बैलागाडा आखाड्यात घुमणार ‘भिर्रर्र’चा आवाज !

  • ग्रामदैवत भैरवनाथ उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यंतीचे आयोजन; पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष अशोक लांडगे यांची माहिती

भोसरी: पिंपरी भोसरीचे (भोजापूर) ग्रामदैवत श्री.भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त वर्षानुवर्षांची परंपरा असलेली बैलगाडा शर्यत याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. बैलागाडा घाटाची तयारी जोरात सुरू असून, पंचक्रोशीतील बैलगाडा शौकीन आणि गाडामालकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

भोसरी गावचे ग्रामदैवत श्री.भैरवनाथ महाराज जत्रेनिमित्त प्रतिवर्षी उरुस भरतो. गेल्या दोन वर्षांत कोविडच्या परिस्थितीमुळे उत्सव झाला नाही. मात्र, यावर्षी निर्बंध हटवल्यामुळे उत्सव थाटा-माटात पार पडला. बैलगाडा शर्यतींवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवल्यानंतर प्रथमच शर्यती होणार आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बुधवार, दि. १८ व गुरूवार, दि. १९ मे रोजी भोसरीतील बैलगाडा घाटात या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

गुढी पाढव्याला गावातील ज्येष्ठ मंडळींची बैठक मंदिरात घेण्याची परंपरा आहे. या बैठकीत गावच्या विकासाबाबत किंवा कारभाराबाबत वर्षभराचे नियोजन केले जाते. भैरवनाथ उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ भोसरी (भोजापूर) यांच्या पुढाकाराने उत्सव आणि बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. पुणे जिल्ह्यासह नगरमधील गाडामालकही भोसरीच्या बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी होतात. यावर्षी प्रशासकीय अडथळ्यांमुळे बैलागाड शर्यत निर्धारित वेळेत बदल करुन पुढे ढकलण्यात आली.

दरम्यान, जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने बैलगाडा शर्यंतींना परवानगी देण्याबाबत सकारत्मक प्रतिसाद दिला असून, दोन दिवसांत अधिकृत परवानगी मिळणार आहे. त्यादृष्टीने घाटाची तयारी जोरदार सुरू आहे, अशी माहिती पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष अशोक लांडगे यांनी दिली.

  • बारा गावे दुसरी, एक गाव भोसरी…

‘बारा गावे दुसरी अन् एक गाव भोसरी’ अशी म्हण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय पटलावर भोसरी कायम केंद्रस्थानी आहे.  राजकीय रस्सीखेच सुरू असताना उत्सवात आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात भोसरीकरांनी राजकारणविरहीत मैदान भरवून एकोप्याचा संदेश दिला. त्यानंतर बैलगाडा शर्यत पुढे ढकलण्यात आली होती. यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा केली जात होती. मात्र, भोसरीकरांनी राजकीय मतभेद आणि पक्षीय राजकारण बाजुला ठेवून एकोप्याने बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. प्रशासनाच्या नियम व अटींचे पालन करीत शर्यतींसाठी तयारी सुरू आहे. त्यासाठी गावातील तरुण मंडळींची घाट तयार करण्यासाठीची लगबग सुरू आहे. गावकीत कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही, असा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील गावांना आदर्श ठरतील, अशा बैलगाडा शर्यती यावर्षी होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • … अशी आहेत लक्षवेधी बक्षिसे

बैलगाडा शर्यतींमध्ये पंचक्रोशीतील गाडामालक सहभागी होणार आहेत. यावर्षी प्रथम क्रमांच्या बैलगाडा मालकास २ लाख १ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आमदार महेश लांडगे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच, माजी नगरसेवक रवि लांडगे यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचे १ लाख ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. राष्ट्रीय खेळाडू योगेश लांडगे यांनी तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपये रोख व सम्राट फुगे यांनी चतुर्थ क्रमांकाच्या ७५ हजार रुपये रोख पारितोषिकाची जबाबदारी घेतली आहे. मंडप आणि संबंधित व्यवस्थेची जबाबदारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी घेतली आहे.

  • अंतिम फेरीतील विजेत्यांना मिळणार अशी बक्षीसे…

अंतिम फेरीत विजेत्या बैलगाडा मालकांना ६ दुचाकी, चांदीची गदा, ३ एससीडी, २ फ्रिज आणि २ जुपते गाडे देण्यात येणार आहेत. यामध्ये दि. १८ मे रोजी होणाऱ्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास माजी नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांच्या वतीने दुचाकी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास स्व. तुकाराम देवकर यांच्या स्मरणार्थ देवराम देवकर यांच्या वतीने दुचाकी तसेच,  तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास अमर लांडे आणि स्वप्नील लांडे यांच्या पुढाकाराने दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे. दि.१९ मे रोजी होणाऱ्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास दिगंबर फुगे यांच्या वतीने दुचाकी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास कै. मारुतीनाना कंद यांच्या स्मरणार्थ आकाश कंद आणि गणेश कंद यांच्या वतीने दुचाकी, तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास सागर गवळी व अनिल लांडगे यांच्या पुढाकाराने दुचाकी भेट देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button