ताज्या घडामोडीपुणे

सर्वसामान्यांच्या गळ्याभोवती महागाईचा फास; इंधन दरवाढीनंतर ‘या’ जीवनावश्यक वस्तूंच्या दरांत मोठी वाढ

 पुणे |  प्रतिनिधी

गेली दोन वर्षे करोनाने कोंडलेला श्वास मोकळा होत असतानाच, महागाईच्या फासाने सर्वसामान्यांचा गळा आवळण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर वाढल्यानंतर खाद्यतेल, गहू, तांदूळ, डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भाज्यांचे दरही वाढले असून, महागाईच्या आगीत आणखी तेल ओतले जात आहे. उत्पन्नाचे स्रोत मात्र मर्यादितच असल्यामुळे घर चालवायचे तरी कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमधील चढउतार, रशिया-युक्रेनमध्ये पेटलेले युद्ध यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक महागल्याने गेल्या तीन महिन्यांत बहुतांश जीवनावश्यक वस्तूंच्या दरांनी उसळी घेतली आहे. खाद्यतेलाचे दर चांगलेच कडाडले असून, जानेवारीमध्ये सूर्यफूल तेलाचा पंधरा किलोचा डबा २३५० रुपयांवरून एप्रिल महिन्यात २७०० रुपये झाला आहे. शरीराला पोषणमूल्य देणाऱ्या डाळी आणि कडधान्यांचे दर गेल्या तीन महिन्यांत दोनशे रुपये क्विंटलने आणि दोन रुपये किलोने वाढले आहेत. तूर, मूग, उडीद, हरभरा आदी डाळींच्या किमती किरकोळ बाजारात तीन रुपयांनी वाढल्या आहेत. गव्हाचे दर क्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपयांनी आणि किरकोळ बाजारात तीन रुपयांनी वाढले आहेत. बासमती तांदूळ किलोमागे दहा रुपयांनी, तर कोलम तांदूळ किलोमागे दोन रुपयांनी वाढला आहे.

किरकोळ बाजारात भाज्यांचे दर गेल्या तीन महिन्यांत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत. दर वर्षी उन्हाळ्यात भाज्यांची दरवाढ होते. त्यात इंधन दरवाढीची भर पडल्याने गेल्या आठवड्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर गगनाला भिडले होते. जानेवारी महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका, त्यानंतर उन्हाचा वाढलेला तडाखा, कमी प्रतवारी यांमुळे चांगल्या भाज्या विकत घेण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय दैनंदिन वापराच्या वस्तूंचे भावही वधारले असून, साबण, पावडर, खोबरे तेल, दंतमंजनासारख्या कॉस्मेटिक वस्तूंच्या किरकोळ किंमतीत दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ झाली आहे. एकंदरीतच महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे खाद्यतेलांच्या किंमती भडकल्या आहेत. डाळींचे उत्पादन वीस टक्क्यांनी कमी आहे, त्यामुळे डाळींची भाववाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे तेथील गव्हाच्या निर्यातीवर परिणाम झाला असून, त्याचा परिणाम किरकोळ बाजारातील गव्हाच्या दरावर झाला आहे.

– उदय चौधरी, किराणा व्यापारी, मार्केटयार्ड

जानेवारी महिन्याच्या तुलनेत सध्या भाज्यांच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आता उन्हाचा तडाखाही वाढला आहे. त्यामुळे भाज्यांची प्रतवारी घटली असून, परिणामी किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक वाढल्यास, त्यांची प्रतवारी चांगली असल्यास, भाज्या स्वस्त होतील.

– प्रकाश ढमढेरे, किरकोळ भाजी विक्रेते

महागाई ज्या प्रमाणात वाढतेय, त्या प्रमाणात पगार वाढत नाहीत. त्यामुळे घर चालविताना ओढाताण होत आहे. मासिक किराणा खर्चांत वाढ झाली आहे. घराच्या, गाडीच्या कर्जाचे हप्ते, गावाकडच्या कुटुंबाचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आजारपण असे विविध खर्च भागविताना अडचणी येत आहेत.

– लता कारकर, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर

आयटी कर्मचाऱ्यांनाही इंधन दरवाढ आणि महागाईचा मोठा फटका बसतो आहे. आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, प्रवास भत्ता दिला जात नाही. कॅब, रिक्षांचे दर आभाळाला भिडले आहेत. त्याचा भुर्दंड कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे.

– सुप्रिया कुकडोलकर, आयटी कर्मचारी

करोना संकट आणि लॉकडाउनच्या काळात संसर्गाच्या भीतीने काम बंद झाल्याने घरकामगारांचे मोठे हाल झाले. आताही कमी पगारावर काम करावे लागते. इंधन दरवाढीमुळे प्रवासाचा खर्च वाढला आहे, तेल, भाज्या, डाळी, किराणा महागल्याने घर चालविताना जीव मेटाकुटीला येत आहे.

– रेखा कांबळे, घरकामगार

वस्तू जानेवारी एप्रिल (रुपयांमध्ये)

सूर्यफूल (१५ किलो डबा) २३५० -२७००

लोकवन गहू (किलो) २५- २७.५०

गुजरात गहू (किलो) ३०- ३३

दिल्ली बासमती तांदूळ (किलो) ९५- १०७

कोलम तांदूळ (किलो) ५२ -५४

साखर ३५- ३५

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button