ताज्या घडामोडीमुंबई

राणा दाम्पत्याचा गनिमी कावा, पोलिसांना गुंगारा देऊन मुंबईत पोहोचले

मुंबई | खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत येऊन पोहोचले आहेत. राणा दाम्पत्याने काही दिवसांपूर्वीच आपण २३ एप्रिलला मातोश्रीवर जाणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून शिवसैनिक आणि पोलिसांकडून राणा दाम्पत्याच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती. मात्र, इतकी सगळी काळजी घेऊनही खासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा हे सगळ्यांना गुंगारा देत शुक्रवारी पहाटे मुंबईत दाखल झाले. त्यामुळे राणा दाम्पत्य मुंबईत नेमके आलेच कसे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

‘एबीपी माझा’च्या माहितीनुसार रवी राणा आणि नवनीत राणा यांना आपल्याला अडवले जाणार याची कल्पना होती. सुरुवातीला हे दोघेही शुक्रवारी रात्रीच्या विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, ट्रेनने प्रवास केल्यास पोलीस आपल्यावर कारवाई करू शकतात, याची कुणकुण राणा दाम्पत्याला लागली होती. तसेच बडनेरा आणि मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर शिवसैनिकांनीही जोरदार ‘फिल्डिंग’ लावली होती. या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन राणा दाम्पत्याने अत्यंत गुप्तपणे मुंबईपर्यंत पोहोचायचे ठरवले.

त्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा पहाटे तीन वाजताच आपल्या अमरावती येथील घरातून बाहेर पडले. अमरावतीहून हे दोघे नागपूरला आले. त्यानंतर या दोघांनी नागपुरहून सकाळी सहा वाजता मुंबईला जाणारे विमान पकडले. मुंबईत आल्यानंतर राणा दाम्पत्य कोणालाही खबर लागू न देता खार येथील आपल्या फ्लॅटवर पोहोचले. इकडे शिवसैनिक राणा दाम्पत्य विदर्भ एक्स्प्रेसने येतील, या आशेने सीएसएमटी स्थानकावर वाट पाहत थांबले होते. मात्र, तोपर्यंत राणा दाम्पत्य मुंबईतील आपल्या घरी सुखरूप पोहोचले होते.

धमक्या द्या, कारवाया करा, मातोश्रीवर जाणारच : रवी राणा

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला १४९ ची नोटीस बजावली असली तरी आता उद्या ते मातोश्रीवर जाण्यावर ठाम आहेत. आम्ही मातोश्रीवर शांततेत हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आलो आहोत. पोलिसांनी आम्हाला घरातून बाहेर पडू नका, यासाठी नोटीस दिली आहे. आम्ही शांतता आणि धार्मिक उद्देशाने आला आहोत. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत उद्या सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणारच, असा निर्धार आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला.

राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीचे ५०० ते ७०० कार्यकर्ते मुंबईत अगोदरच दाखल झाले आहेत. याशिवाय, आणखी काही कार्यकर्ते आज रात्री विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना होतील. त्यामुळे उद्या मुंबईत हायव्होल्टेड ड्रामा रंगण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button