TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

किशोरवयीन मुलींना ‘पीसीओएस’ची समस्या!

मुंबई : केवळ प्रौढ महिलाच नव्हे तर हल्ली किशोरवयीन मुलींमध्येही पीसीओएसच्या (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

लठ्ठपणा, जीवनशैली आणि अनुवांशिकता हे पीसीओएस होण्यामागचे मूळ कारण असू शकते. किशोरवयातील समस्यांकडे पालकांनी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि वेळेवर वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे.  याशिवाय संतुलित आहार घेणे, दररोज व्यायाम करणे, तणावमुक्त राहणे गरजेचे आहे.  पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पीसीओएस हे किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे दिसून येते. एन्ड्रोजनची उच्च पातळी असलेल्या मुलींना या स्थितीचा त्रास होऊ शकतो.   आठवडय़ाला पीसीओएसच्या तक्रारी असलेले ५ ते १० रुग्ण उपचारासाठी दाखल होतात असे जे. जे. रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. अशोक आनंद म्हणाले. तर या स्थितीकडे दुर्लक्ष करू नका. या स्थितीचे व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे खारघर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिमा थमके यांनी सांगितले.

डॉ. आनंद म्हणाले की, तरुण मुलींमध्ये पीसीओएसच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. सध्याची बदललेली जीवनशैली याला कारणीभूत ठरत आहे.  वेळीच निदान व उपचार झाल्यास पीसीओएसवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. परंतु, मुली उपचारासाठी येत नसल्याने मासिक पाळी अनियमित झाल्याने विविध आजार उद्भवू शकतात.

शीव रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे युनिट हेड प्राध्यापक  डॉ. निरंजन चव्हाण म्हणाले की, मासिक पाळी अनियमित होण्याची समस्या अनेक मुलींमध्ये पाहायला मिळत आहे. जीवनशैलीत बदल करणे हाच यावर योग्य पर्याय आहे.

आहार काय घ्यावा?

औषधोपचारांव्यतिरिक्त, तुम्हाला संतुलित जीवनशैलीचे पालन करावे लागेल. ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, मसूर, कडधान्ये, काजू आणि तेलबिया आणि पुरेसे पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तेलकट, मसालेदार, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. जर मुलीला जास्त रक्तस्राव होत असेल तर रक्ताची कमतरता टाळण्यासाठी लोहयुक्त अन्नाचे सेवन करावे. पालक, सुकामेवा, अंडी आणि ब्रोकोलीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते आणि याचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. व्यायाम करणे आणि योग्य वजन राखणे अत्यावश्यक असल्याचे चेंबूर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वीणा औरंगाबादवाला यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button