छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर येणार राष्ट्रपती
मुंबई |
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच रायगडाला भेट देणार आहेत. यासंदर्भातील माहिती भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विटरवरुन दिली आहे. संभाजीराजेंनी गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ट्विटरवरुन यासंदर्भातील एक ट्विट केलं असून राष्ट्रपतींचा हा दौरा कसा ठरला आणि तो कधी होणार आहे यासंदर्भातील माहिती दिलीय.
संभाजीराजेंनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार त्यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिलं होतं. “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत,” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना संभाजीराजेंनी राष्ट्रपती रायगडाला भेट देणार “ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे,” असंही म्हटलंय.
राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.@rashtrapatibhvn
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 25, 2021
- मोदींनीही दिलेली भेट….
यापूर्वी ५ जानेवारी २०१४ रोजी त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. सांगली येथील शिव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महानगड ते रायगड या पायी मोहिमेचा समारोप रायगड किल्ल्यावर झाला. याच कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित होते. शिवरायांना अभिवादन करून त्यांनी उपस्थित जनसभेला संबोधित केलं होतं. पुणे विमानतळावरून सकाळी हेलिकॉप्टरने मोदी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील हेलिपॅडवर उतरले होते. मोदी यावेळी प्रथमच रायगडच्या दौऱ्यावर आले होते.
- गडाचे दरवाजे बंद करण्यात आलेले
नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचे कारण पुढे करत ४ जानेवारीपासूनच रायगडाचे दरवाजे सर्वसमान्यांसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिकांमधे नाराजीचा सूर दिसून आला होता. काही दिवस गडाच्या सुरक्षेची जबाबदारी गुजरात पोलीस आणि रायगड पोलीसाच्या ताब्यात देण्यात आलेली. यासाठी गुजरात पोलीसांचे पथक रायगडमधे दाखल झाले होते. कार्यक्रमाचे आयोजक आणि गुजरात पोलीस सांगतील त्यांनाच गडावर प्रवेश दिला जाईल असा फतवा काढण्यात आला होता.