आज विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता
पुणे | गेल्या 10 महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड प्रथमच आवाजी व खुल्या पद्धतीने होणार आहे. त्यासाठी विधानसभा निवडणूक निवडीच्या पद्धतीत बदल केला आहे. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच आणि याच अधिवेशनात होईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांची निवड निश्चित मानली जात आहे.राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत असून विधानसभा अध्यक्षांची निवडही या अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला हे पद देण्याचा विचार सत्तारूढ महाराष्ट्र विकास आघाडीने बोलून दाखवला असून विरोधकांचाही उमेदवार लोकशाहीमध्ये पाहिजेच, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला आव्हान दिले.
हिवाळी अधिवेशन परंपरेने नागपुरात होणार होते. मात्र, तिसर्या लाटेची भीती आणि मुख्यमंत्र्यांच्या तब्बेतीमुळे ते मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत अजूनही ठीक नसल्याने ते अधिवेशनादरम्यान सभागृहात किती काळ उपस्थित राहणार याबाबतही प्रश्न आहे. त्यामुळे विरोधकांचा सामना करण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे महाविकास आघाडी सरकार विरोधकांचे हल्ले कसे परतावून लावणार याची उत्सुकता आहे.