breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अहमदनगरच्या ‘त्या’ विद्यालयातील करोनाबाधितांची संख्या वाढली; ५१ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह

नगर |

गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगभरात भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतात आणि महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनचा फैलाव आता होऊ लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. देशात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यातच अहमदनगरच्या एका विद्यालयात तब्बल १९ विद्यार्थी करोना पॉझिटीव्ह आढळल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर या विद्यालयातील बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांत बाधितांची संख्या तब्बल ५१वर पोहोचली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात १९ विद्यार्थी करोनाबाधित आढळले होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली होती. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावात असलेली निवासी शाळा ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग आहे. शाळेत ५वी ते १२वी पर्यंत वर्ग असून ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, असेही अधिकाऱ्यांने सांगितले होते. “गेल्या काही दिवसांत १९ विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. सर्वांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतेक संक्रमित विद्यार्थ्यांना करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तर काहींमध्ये फक्त सौम्य लक्षणे दिसत होती,” अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली होती.

  • शाळा बंद करण्याचा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा…

देशात ओमायक्रॉनची भीती वाढत असताना, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य पुन्हा शाळा बंद करण्याचा विचार करू शकते असे तीन दिवसांपूर्वी म्हटले होते. महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन प्रकरणांबाबत वाढलेल्या चिंतेला उत्तर देताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता वर्तवली होती. राज्यात ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते, असं गायकवाड यांनी म्हटलं होतं.

  • ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात…

दरम्यान, देशात ओमायक्रॉनचे रुग्णही वाढू लागले आहेत. देशातील १७ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वात जास्त १०८ रुग्ण आहेत. त्यापैकी ४२ रुग्ण आतापर्यंत करोनातून बरे झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत ७९ असून त्यापैकी २३ जण बरे झाले आहेत. गुजरातमध्ये ४३ रुग्ण असून त्यापैकी १० जण बरे झाले आहेत. तेलंगाणामध्ये ४१, तामिळनाडूमध्ये ३८, केरळमध्ये ३४, कर्नाटकमध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button