पुणे

समाजाच्या उन्नतीसाठी गांधीविचार अंगीकारण्याची गरज : अण्णा हजारे

पुणे l प्रतिनिधी

“जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत. या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ध्येयवाद, इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करावेत. आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. त्यावर मात करून यशस्वी होता आले पाहिजे. गांधीविचार हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी गांधीविचारांचा अंगिकार करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केले.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशनच्या वतीने राळेगणसिद्धी येथे झालेल्या कार्यक्रमात अण्णा हजारे यांना तिसरा ‘गांधीयन फिलॉसॉफी अवार्ड’ प्रदान करण्यात आला. यावेळी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत धिवरे, वी सिटीझन्सचे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, शिक्षण संचालक दिनकर टेमकर, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, विभागीय वन अधिकारी किर्ती जमदाडे, ‘सूर्यदत्ता’चे कार्यकारी संचालक प्रा.अक्षित कुशल, प्रशांत पितालिया, रोहित संचेती आदी उपस्थित होते.

राळेगणसिद्धी येथे निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या पर्यावरण संमेलनावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अण्णा हजारे यांना भारताचे दुसरे गांधी असेही संबोधले जाते. त्यांनी गांधीमार्गाने उभारलेल्या चळवळी जगभर गाजल्या. राळेगणसिद्धी येथे त्यांनी केलेले ग्रामविकासाचे कार्य, भ्रष्टाचाराविरोधातील कार्य, अनेक संकटाना शांत व संयमी पद्धतीने सामोरे जात त्यातून मार्ग काढत अण्णांनी समाजसेवेचा वसा कायम जपला आहे. याची दखल घेऊन ‘सूर्यदत्ता’च्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

अण्णा हजारे म्हणाले, “समाजातील काही व्यक्ती व्यक्तिगत संसार मोठा करण्यासाठी धडपडत असतात. मात्र, संजय चोरडिया यांनी सूर्यदत्ता ग्रुप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून समाजातील ज्ञानाचा संसार अधिक मोठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजाला उपयोगी असे काम करायला हवे. सामाजिक कार्य करताना अनेक अडचणी येतील, आरोप-प्रत्यारोप होतील, पण त्यावर शब्दातून, टीकेतून उत्तर न देता आपल्या कार्यातून द्यावे. बदल्याची भावना आपल्या मनात असू नये. अहिंसा, शांतता, प्रामाणिकता या गोष्टींचा अवलंब करावा.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ता शिक्षण संस्थेने गांधी विचारांना आदर्श मानत गेली दोन दशके कार्य उभारले आहे. आमच्या विद्यार्थी-शिक्षकांमध्ये हे विचार रुजावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अण्णा हजारे गांधीजींचा विचार घेऊन समाजामध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी गांधी मार्गाने केलेली आंदोलने आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करताना खऱ्या अर्थाने गांधी विचारांचा सन्मान होत असल्याचा विशेष आनंद आहे. अण्णांनी गांधीविचार जगत समाजपरिवर्तनाचे अनेक लढे उभारले आहेत. आदर्श ग्रामविकासाचे मॉडेल उभारत ‘खेड्याकडे चला’ हा गांधीजींचा विचार प्रत्यक्षात आणला. युवकांमध्ये गांधीविचार रुजले, तर देशाच्या जडणघडणीला आकार येईल.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button