breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्रियकरासोबत आईनेच नवजात अर्भकास शौचालयाच्या भांड्यात कोंबलं, पुण्यात खळबळजनक घटना

पुणे : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या एका नवजात अर्भकास जन्म दिलेल्या नराधम आईनेच पोटच्या गोळ्याला प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयातील भांड्यात कोंबून ठेवल्याची धक्कादायक घटना सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर इथे घडली आहे.

पण ‘देव तारी त्याला कोण मारी’ याप्रमाणे या घटनेची माहिती मिळताच देवदूताप्रमाणे सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अजय माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने अथक परिश्रमाने शौचालयात कोंबलेल्या या नवजात अर्भकास बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक महिला समाज मंदिरामागे तुकाई नगर वडगाव इथे एका महिलेने नवजात अर्भकास जन्म देऊन भांड्यामध्ये कोंबून ठेवले होते, असा कंट्रोलवरून सकाळी आठ वाजेच्या सुमारास कॉल आला.

दरम्यान, कॉलची माहिती मिळताच ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करताच त्यांना येथील महिला शौचालयात असलेल्या भांड्यात हे नवजात अर्भक कोंबलेले रडत असलेले आढळून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नागरिकांच्या मदतीने हे चिमुकले बाळ भांड्यातून वरती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे कठीण होते. त्यातच रक्तश्राव होत होता. त्यामुळे त्यांनी हाताला तेल लावून त्या चिमुकल्या बाळाला भांड्यातून बाहेर काढले. यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.

सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली व माळी व कट्टे यांचे अभिनंदन केले. दरम्यान, या निर्दयी प्रकारामुळे तुकाई नगर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्दयी व नराधम असलेल्या महिलेस व तिला साथ देणाऱ्या तिच्या प्रियकरास ताबडतोड अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. हे नवजात अर्भक मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अमलदार अजय माळी यांनी सदर महिलेविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button