breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

सामनातून थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल, ‘ट्रम्प महाशय ‘भान’ ठेवून बोलले हे काय कमी झाले?’

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

ज्या ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द चेष्टेची ठरली होती त्याच ट्रम्प महाशयांनी ‘आपला देश चेष्टेचा विषय बनला आहे,’ अशी टीका आता करावी, हा विनोदच आहे. ट्रम्प यांची आगपाखड भले त्यांच्यावर झालेली एफबीआयची छापेमारी आणि त्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे झाली असेल, पण अमेरिकेवरील आर्थिक संकट आणि त्या देशाच्या ‘जागतिक महासत्ता’ पदाला निर्माण झालेला धोका अगदीच निराधार म्हणता येणार नाही. ‘थयथयाट’ म्हणून का असेना, ट्रम्प महाशय ‘भान’ ठेवून बोलले हे काय कमी झाले? अशा शब्दात आज शिवसेनेचे मुखपत्र सामना अग्रलेखातून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

अमेरिका ही जागतिक महासत्ता. संपूर्ण जगावर अधिराज्य गाजविण्याचा ठेका फक्त आपल्याकडेच आहे, या आविर्भावात अमेरिकेचे आजवरचे सगळेच राज्यकर्ते वागले. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांसह जी आयुधे वापरता येतील त्यांचा अमेरिकन राज्यकर्त्यांनी सर्रास वापर केला. मात्र, आता हीच महासत्ता ‘महापतना’च्या दिशेने वाटचाल करीत आहे, असा आरोप खुद्द अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केला आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर टीका करताना ट्रम्प यांनी हा आरोप केला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था विनाशाच्या उंबरठय़ावर पोहोचली असून इंधनासाठी सौदी-अरेबियाच नव्हे, तर व्हेनेझुएलासारख्या देशांसमोरही पदर पसरण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी टीका केली आहे. अमेरिकेतील महागाई विक्रमी पातळीवर गेली आहे. शिक्षण व्यवस्था मोडीत निघाली आहे. गुन्हेगारी वाढत आहे. परराष्ट्र धोरण ही अमेरिकेसाठी अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील गोष्ट, परंतु तेथेही सगळा आनंदीआनंदच आहे, अशा शब्दांत ट्रम्प महाशयांनी बायडेन सरकारचा समाचार घेतला आहे. गेल्या काही काळापासून अपयशी ठरलेला अमेरिकेचा प्रवास महापतनाच्या दिशेने सुरू आहे, असे ते म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर जी आगपाखड केली आहे, त्यामागे गेल्या महिन्यात त्यांच्या घरी अमेरिकन गुप्तचर संस्थेने केलेली छापेमारी हे कारण असू शकते. असही सामना अग्रलेखात म्हटले आहे.

या छाप्यामध्ये काही ‘संवेदनशील’ सरकारी दस्तऐवज सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने हा दावा केला आहे. ट्रम्प यांच्याविरुद्ध 2020 मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल बदलण्याच्या कथित प्रयत्नाचेही प्रकरण सुरू आहेच. त्यात या छापेमारीचा तपशील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने उघड केला. त्यामुळेच ट्रम्प महाशयांचा ‘रक्तदाब’ वाढला असावा आणि विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या नावाने त्यांनी ठणाणा केला असावा. मुळात डोनाल्ड ट्रम्प यांची स्वतःचीच कारकीर्द अनेक कारणांनी वादग्रस्त ठरली होती. त्यांच्यातील ‘वाचाळवीरा’चे दर्शन जगाला अनेकदा झाले होते. अगदी गेल्या महिन्यात तैवानला भेट दिलेल्या अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनाही त्यांनी ‘वेडी’ असे संबोधले होते. अमेरिकेसारख्या महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष असूनही त्यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद करण्याची कारवाई ट्विटर पंपनीला करावी लागली होती. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विचित्र आणि विक्षिप्त वागणारे डोनाल्ड ट्रम्प आता विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर अमेरिकेला महापतनाकडे नेल्याचा आरोप करीत आहेत. अर्थात, त्यांनी अमेरिकेच्या सद्यस्थितीवर ओढलेले सगळेच कोरडे निराधार आणि गैरलागू आहेत असे नाही. असं सामनात म्हटले आहे.

अमेरिकन अर्थव्यवस्था ‘ऐतिहासिक’ हेलकावे खात आहे हे खरेच आहे. तेथील महागाईने चार दशकांतील उच्चांक गाठला आहे आणि नजीकच्या काळात ती कमी होण्याची चिन्हे नाहीत. रशियाकडून इंधन तेलाचा पुरवठा कमी झाल्याने सौदी व व्हेनेझुएलासारख्या देशांकडे इंधनासाठी अमेरिकेला भीक मागावी लागत आहे. त्यात सौदी आणि इतर ‘ओपेक’ देशांनी तेल उत्पादन कमी केल्याने अमेरिकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेवर पुन्हा एकदा मंदीचे गडद सावट आले आहे. ट्रम्प यांनी बायडेन यांची हीच दुखरी नस दाबली आहे. ज्या ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द चेष्टेची ठरली होती त्याच ट्रम्प महाशयांनी ‘आपला देश चेष्टेचा विषय बनला आहे,’ अशी टीका आता करावी, हा विनोदच आहे. ट्रम्प यांची आगपाखड भले त्यांच्यावर झालेली एफबीआयची छापेमारी आणि त्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे झाली असेल, पण अमेरिकेवरील आर्थिक संकट आणि त्या देशाच्या ‘जागतिक महासत्ता’ पदाला निर्माण झालेला धोका अगदीच निराधार म्हणता येणार नाही. ‘थयथयाट’ म्हणून का असेना, ट्रम्प महाशय ‘भान’ ठेवून बोलले हे काय कमी झाले? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button