breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

देशाच्या विकासाचे ‘पंचप्राण’, ‘या’ गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

नवी दिल्ली: आगामी काळात भारताच्या विकासाच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंचप्राण’ या नव्या संकल्पनेनुसार वाटचाल करण्याची घोषणा केली. गेल्या ७५ वर्षांच्या प्रवासात भारताने अनेक चढउतार पाहिले. मात्र, यापुढील काळात भारताला विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करायची असेल, तर पंचप्राण ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी देशवासियांना संबोधित केले.तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला.

काय आहे पंचप्राण संकल्पना?

पहिला पंचप्राण म्हणजे, यापुढे देशाने खूप मोठे संकल्प निश्चित करून वाटचाल केली पाहिजे. तरच भारताचा विकास शक्य आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दुसरा पंचप्राण म्हणजे देशवासियांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेही गुलामीचा अंश असू नये. प्रत्येकाने आपल्या मनातील गुलामीची जाणीव काढून टाकली पाहिजे. शेकडो वर्षांच्या गुलामीमुळे आपल्या मनात अनेक विकृती तयार झाल्या आहेत. ही गोष्ट आपल्या मनातून शतप्रतिशत काढून टाकली पाहिजे. त्यामुळे यापुढे देशात गुलामीचे प्रतिक असलेली कोणतीही गोष्ट आढळून आली तर ती काढून टाकुयात, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

तिसरा पंचप्राण म्हणजे आपल्याला देशाच्या वैभवशाली वारशाबद्दल गर्व असला पाहिजे. याच वारशामुळे भारताने सुवर्णकाळ पाहिला आहे. हा वारसा काळानुसार समृद्ध होत आला आहे. त्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. चौथा पंचप्राण म्हणजे देशाची एकता आणि एकजुटता. देशातील १३० कोटी जनतेमध्ये एकता असली पाहिजे. देशात परकं कोणी नसलं पाहिजे. ही एकता असेल तर भारत श्रेष्ठ होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पाचवा आणि शेवटचा पंचप्राण म्हणजे नागरिकांना कर्तव्याची जाणीव होणे. देशातील नागरिकांना आपल्या कर्तव्यांची जाणीव झाली तरच देश पुढे जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फाळणीच्या आठवणींना उजाळा

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात फाळणीच्या आठवणींना उजाळा दिला. काल १४ ऑगस्ट होता. त्यावेळी फाळणीच्या दु:खद आठवणी जाग्या झाल्या. पण देशावरील प्रेमापोटी त्यावेळी ज्या लोकांनी हे सर्वकाही सहन केले, त्यांना माझे नमन आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. आजवर स्वातंत्र्यलढ्यातील अनेक वीरांचा विसर पडला होता. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण या सर्व अज्ञात वीरांना देशाने नमन केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मी स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेला पहिला पंतप्रधान, मला अभिमान वाटतो: नरेंद्र मोदी

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला येऊन लाल किल्ल्यावरून भाषण करणारा मी पहिला पंतप्रधान आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या प्रवासात देशाने अनेक चढउतार पाहिले. २०१४ मध्ये देशवासियांनी मला जबाबदारी दिली. मी तुम्हाला जेवढं ओळखलंय, मला जेवढं समजलं त्यावरून मी दलित, शोषित, आदिवासी, महिला, तरुण, शेतकरी आणि वंचितांच्या कल्याणासाठी काम केले. देशातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करण्याचा महात्मा गांधींचा मंत्र मी जपला. आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना मला अभिमान वाटतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतातील जनतेच्या आकांक्षा आहेत. त्यामुळे कोणत्याही सरकारला नेहमीच काटेरी वाटेवर चालावे लागते. त्यासाठी देशवासियांच्या आकांक्षा पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. आता देशातील जनतेला आकांक्षापूर्तीसाठी फारकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button