breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावती शहरात युरोपीय पक्षी ‘ग्रीन वॉर्बलर’ची प्रथमच नोंद

अमरावती |

वडाळी येथील बांबू गार्डनमध्ये पक्षीनिरीक्षण करताना प्रशांत निकम पाटील, शुभम गिरी, संकेत राजूरकर आणि आनंद मोहोड यांना ‘ग्रीन वॉर्बलर’ हा युरोपीयन दुर्मिळ पक्षी आढळून आला. पक्षी विविध कारणांकरिता स्थलांतरण करत असले तरी भारतीय उपखंडात हिवाळ्यात होणारे मोठ्या प्रमाणातील पक्षी स्थलांतरण हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पक्षीनिरीक्षक, अभ्यासक आणि पक्षी छायाचित्रकार यांना हा काळ म्हणजे एक पर्वणीच असतो. २ ऑक्टोबरला शहरातील बांबू गार्डन येथे पक्षीनिरीक्षण करताना पक्षीनिरीक्षकांना ‘ग्रीन वॉर्बलर’ असे इंग्रजी नाव असलेल्या या हिवाळी पाहुण्या पक्ष्याची छायाचित्रासह नोंद करण्यात यश प्राप्त झाले आहे. या पक्ष्याला ‘फायलोस्कोपस निटीडस’ असे शास्त्रीय नाव असून अद्याप मराठी नाव उपलब्ध नाही, यावरून या पक्ष्याची दुर्मिळता लक्षात येते. हा पक्षी पूर्वी ग्रीनिश वॉर्बलर म्हणूनच ओळखला जायचा. साधारणपणे २००६ ते २००८ या कालावधीत झालेल्या संशोधनाअंती हा पक्षी ग्रीनिश वॉर्बलरपेक्षा पूर्णत: वेगळा असण्याबाबत मान्यता मिळाली.

दक्षिणमध्य युरोपमध्ये मूळ अधिवास असणारा हा चिमुकला पक्षी इतर वटवट्या पक्ष्याप्रमाणे झाडांच्या गर्दीत, खुरट्या झाडीमध्ये सूक्ष्म जीव, कीटक,अळ्या किंवा तत्सम खाद्य शोधताना अत्यंत अस्थिर आणि वेगाने हालचाल करतो. याची लांबी साधारणपणे १० ते ११ से.मी. असते. स्थलांतर करून मुख्यत: भारताचा दक्षिण भाग व श्रीलंका येथे याचे हिवाळ्यात आगमन होते. ग्रीनिश वॉर्बलर पेक्षा अधिक हिरव्या रंगांचे पंख, पंखावर दोन पांढुरके पट्टे, स्पष्ट व लांब भुवई, चेहऱ्यावरचा पिवळा रंग आणि खालच्या चोचेचा किंचित पिवळसर नारिंगी रंग अशा या पक्ष्याच्या ओळखीच्या खास खुणा आहेत. पंखावरील दोन पांढऱ्या पट्ट्यापैकी एक अतिशय अस्पष्ट असतो. बरेचदा दुसरा पट्टा दृष्टिक्षेपास पडत नाही.

या पक्ष्याची ही अमरावती जिल्ह्यातील पहिलीच नोंद आहे आणि वॉर्बलर पक्ष्याला ‘वटवट्या’ असे म्हणत असल्यामुळे याच्या हिरव्या रंगामुळे मराठी भाषेत ‘हिरवा किंवा हरित वटवट्या’ असे नामकरण त्याच्या वैशिष्ट्याला साजेसे होईल, असे मत प्रशांत निकम पाटील यांनी व्यक्त केले आहे. या पक्ष्याच्या जिल्ह्यातील या पहिल्या नोंदीमुळे अमरावतीच्या पक्षीयादीत भर पडली असून जिल्ह्यात पक्षी स्थलांतरणास जोरात सुरुवात झाल्याबद्दल पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button