पिंपरी : कुटुंब, समाज व देश आत्मनिर्भर करावयाचा असल्यास कुटुंबातील अत्यंत महत्वाचा घटक महिला यांना विविध व्यवसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्या व्यावसायाची साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तरच संपूर्ण देश आत्मनिर्भर, होईल, असे प्रतिपादन दिनेश यादव यांनी केले.
सोमवार(दि.२८) रोजी कुदळवाडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने ज्या महिलांनी मोफत शिवण क्लास, ब्युटी पार्लर प्रशिक्षण पूर्ण केले अशा ८० महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपून समाज ऋण फेडण्यासाठी दिनेश यादव व निशा यादव यांनी कुदळवाडीतील महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी हे प्रशिक्षण वर्ग सुरू केले होते.
त्याप्रसंगी बोलताना दिनेश यादव म्हणाले की, शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला. नोकरी नाही आणि सध्या आत्मनिर्भरतेवर विशेष जोर आहे. म्हणून कुटुंबातील अत्यंत महत्वाचा घटक महिला यांनी कपडे शिवणे, सण व उत्सवाला लागणारे साहित्य घरीच तयार करून विकणे हे आत्मनिर्भरतेचे मार्ग स्वीकारून आर्थिक दृष्टया सक्षम राष्ट्र उभारणीस हातभार लवावा. तसेच स्वतः ही आर्थिक सबल व्हावे असेही यादव यांनी आवाहन केले. ८० महिला आपल्या पायावर उभ्या राहतील यांचा मोठा आनंद आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने यापुढेही आपण हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करणार आहोत. महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपापल्या भागात वेगवेगळे उपक्रम राबवा असे आवाहन आमदार महेशदादा लांडगे व पुजाताई लांडगे करत असतात असे दिनेश यादव यांनी उपस्थित महिलांना सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काका शेळके यांनी केले.