केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स; सीटी स्कॅनबाबत रुग्णांना सल्ला
नवी दिल्ली | प्रतिनिधी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे वेगाने संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. यानंतर गेल्या आठवड्याभरात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्या दर दिवशी ६ हजार वरून थेट जवळपास ६० हजार इतकी झाली आहे. यामुळे आता केंद्राने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने सौम्य लक्षणं असलेल्या आणि लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान ७ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात येईल. तसंच त्यांना किमान सलग तीन दिवस ताप नसेल तरच डिस्चार्ज आणि आय़सोलेशनपासून सुटका मिळेल. होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चाचणीची आवश्यकता नाही असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असून आता देशात रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.