ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांच्या साताऱ्यात रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा आखाडा

सातारा | महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या आणि भारत देशाला ऑलिंपिकमधील कुस्ती क्षेत्रातील पहिले कांस्यपदक मिळवून देणार्‍या ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या सातारा जिल्ह्यात यंदा दोन वर्षाच्या कालखंडानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आखाडा रंगणार आहे. पुढील महिन्यात ४ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान या मानाच्या कुस्ती स्पर्धेच्या लढती सातारा जिल्ह्याचा मानबिंधू असणाऱ्या सातारा शहरातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात रंगणार आहेत. महाराष्ट्र केसरीचे यजमानपद मिळाल्याने साताऱ्याच्या क्रीडाक्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या नव्हत्या. त्यामुळे यंदा या स्पर्धा होत असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे. नुकतीच कै. मोहोळ कुस्ती केंद्रात राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी सभा काल गुरुवारी झाली. या सभेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ६४वी वरिष्ठ गट गादी माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी ‘किताब लढत’ ४ ते ९ एप्रिलपर्यंत साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात घेण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच ज्युनियर व सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी १८ मार्च ते २० मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड येथील मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल भोसरी येथे घेण्याचे ठरले. या कार्यकारिणी सभेस परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, गणेश कोहळे, हनुमंत गावडे, संभाजी वरूटे, दयानंद भक्त, सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे, खजिनदार सुरेश पाटील, तांत्रिक सचिव बंकट यादव, विभागीय सचिव संपतराव साळुंखे, विनायक गाढवे, सुनील चौधरी, वामनराव गाते, भरत मेकाले, मुरलीधर टेकूलवार, शिवाजी धुमाळ, सुभाष घासे, सुभाष ढोणे, आदीजण उपस्थित होते, अशी माहिती परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button