ताज्या घडामोडीमुंबई

ठाणे महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण

रहिवाशांच्या डोक्यावर टांगती तलवार

ठाणे : पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळून घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले असून नऊ प्रभागांमध्ये ४ हजार ४११ धोकादायक इमारतींची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी शहरात ४ हजार २९७ धोकादायक इमारतीं होत्या, यामध्ये यंदा ११४ने वाढ झाली आहे. मुंब्रा प्रभागात सर्वाधिक १ हजार ३४३ आणि वागळे प्रभागात १ हजार ९८ धोकादायक इमारत असल्याचे समोर आले आहे. या धोकादायक इमारतींपैकी अतिधोकादायक गटात ९७ इमारतींचा समावेश झाला असून या इमारती तात्काळ रिकाम्या करण्याची आवश्यकता आहे. शहरातील अतिधोकादायक इमारतींची संख्याही वाढून ९७ पर्यंत पोहचल्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावर दुर्घटनेची टांगती तलवार कायम आहे.

पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळून त्यामध्ये जीवितहानी होण्याचे प्रकार वाढल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापुर्वी महापालिकांकडून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून प्रशासनाकडून या संदर्भातील माहिती नागरिकांना दिली जाते. सी १ अती धोकादायक, इमारत रिकामी करून दुरूस्त करण्यायोग्य सी२ ए, रहिवाशांना इमारतीमध्ये राहून दुरूस्ती करण्यायोग्य सी २ बी आणि किरकोळ दुरूस्ती करण्यायोग्य सी ३ अशा चार श्रेणींमध्ये या इमारतींची नोंद केली जाते. पैकी सी १ अतीधोकादायक प्रकारामध्ये शहरातील ९७ इमारती आहेत. त्यामुळे या इमारती तात्काळ रिकाम्या करून रहिवाशांना पर्यायी जागी स्थलांतरीत करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु महापालिकेकडे नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी पर्यायी घरे नसल्यामुळे इमारती रिकाम्या करण्याची कारवाईमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनेक रहिवासी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत. धोकादायक इमारतींची नोंदीमध्ये मुंब्रा प्रभागात १३४३, वागळेमध्ये १०९८, दिवा प्रभागात ६६४, नौपाडा-कोपरी ४५०, लोकमान्य-सावरकरनगर २२४, कळवा २४६, उथळसर १६७, माजीवडा मानपाडा १५७ तर वर्तकनगरमध्ये ६२ इमारतींचा समावेश आहे.

धोकादायक इमारती कशा ओळखाल?
ठाणे महापालिकेकडून धोकादायक इमारती ओळखण्याच्या दृष्टीने प्राथमिक लक्षणे सूचवली आहेत. त्यामध्ये इमारतीच्या आरसीसीफ्रेम, कॉलम, बीम, स्लॅब या रचनेत बदल होत असल्यास उदा. इमारतीचे कॉलम, बीम, स्लॅब झुकल्यासारखे दिसल्यास. इमारतीच्या तळमजल्याचा भाग खचला, कॉलममध्ये भेगा, कॉलमचे काँक्रीट पडणे, इमारतीचा कॉलम फुगणे, आरसीसी मेंबर्स कॉलम-बीम्स व विटांची भिंती यातील सांधा, भेग वाढणे,स्लॅबचे किंवा बीमचे तळमजल्याचे कॉंक्रीट पडणे, इमारतीच्या प्लास्टरला भेग वाढत जाणे, इमारतीच्या काही भागात आवाज होणे, स्लॅब बीम, कॉलमच्या भेगांचा आकार गंजल्यामुळे कमी झाल्यास इमारतीला धोका असल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला संपर्क करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

स्ट्रक्चरल ऑडिट करा…
इमारत धोकादायक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ इमारत खाली करून इतर रहिवाशांनाही सतर्क करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शहरातील जागरूक नागरिकांनीही आपल्या परिसरातील इमारतींवर लक्ष ठेवून दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. याशिवाय ३० वर्षे जुन्या इमारतींचे महापालिकेकडे नोंदणी असलेल्या स्ट्रक्चर इंजिनीअरकडून इमारतींचे परीक्षण करून घेण्याची आवश्यकता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button