breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सूरतमधील वस्त्रोद्योग धुळे-नंदुरबारमध्ये?; व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा

धुळे |

सूरतमध्ये जागा नसल्याने गुजरातमधील वस्त्रोद्योगाशी संबंधित उद्योग महाराष्ट्रात यायला तयार झाले आहेत. गुजरातच्या वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यापारी शिष्टमंडळ अलीकडेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटले. त्या वेळी सूरतपासून धुळे-नंदुरबार जवळ असल्याने येथेच उद्योग उभारण्याचा आग्रह धरण्यात आला. यामुळे प्राधान्याने हे उद्योग धुळे, नंदुरबार जिल्ह्य़ांत येण्याची शक्यता असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. गुजरातच्या सीमेवरील नवापूरमध्ये आधीपासून हे उद्योग स्थिरावत आहेत. त्यांची संख्या वृद्धिंगत झाल्यास आदिवासीबहुल भागाच्या विकासाला गती मिळणार आहे.

उद्योगांना गुजरातमध्ये अधिक सवलती दिल्या जातात, असे उद्योगवर्तुळात नेहमी सांगितले जाते. त्यामुळे त्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याची उदाहरणे आहेत. जागेअभावी आता तेथील काही उद्योग पुन्हा महाराष्ट्रात येण्याची आशा निर्माण झाली आहे. धुळे शहराला लागून असलेल्या अवधान औद्योगिक वसाहतीत १०० गोदामांचा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन सोमवारी उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार कुणाल पाटील, आ. फारुक शाह, आ. मंजुळा गावित, महापौर प्रदीप कर्पे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात उद्योगमंत्री देसाई यांनी उपरोक्त माहिती दिली. शासनाने प्रशासन गतिमान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच करोनाकाळातदेखील ६० कंपन्यांचे सामंजस्य करार झाले. नवे वस्त्रोद्योग धोरण आखल्याने गुजरातच्या सूरतमधील व्यापारी आता आपल्या राज्यात गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. अलीकडेच गुजरातच्या व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटले. राज्यात उद्योगउभारणीबाबत त्यांनी चर्चा केली. सूरतमध्ये उद्योग का उभारत नाही, याबद्दल विचारणा केली असता त्यांनी जागाच शिल्लक नसल्याचे सांगितले. त्यावर सूरतपासून धुळे-नंदुरबार जवळ असल्याने तेथे वस्त्रोद्योग उभारण्यास सुचविण्यात आले. येथे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जमीनही कमी किमतीत मिळेल. त्यावर गुजरातच्या व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे देसाई यांनी नमूद केले. गेल्या दोन वर्षांत राज्यात अनेक संकटे आली. त्यास शासनाने समर्थपणे तोंड दिले. या काळातही उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.

  • १८०० औद्योगिक भूखंड सरकारजमा

औद्योगिक वसाहतीत काहींनी जमिनी घेतल्या आहेत. मात्र ते उद्योग करतच नाहीत. त्यामुळे जे उद्योग उभारत नाही, अशांचे भूखंड एक इशारा देऊन शासन ताब्यात घेईल. आतापर्यंत राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील बिनउद्योगी एक हजार ८०० भूखंड शासनाने ताब्यात घेतले असल्याची माहिती उद्योगमंत्री देसाई यांनी दिली.

धुळे, नंदुरबार जिल्ह्य़ात धुळे, नरडाणा, नवापूर व नंदुरबार या चार ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. नंदुरबार वगळता इतर ठिकाणी नव्या उद्योगांसाठी जागा उपलब्ध नाही. नंदुरबारच्या वसाहतीत वीजजोडणी मिळालेली नाही. नवापूरच्या वसाहतीत ८० भूखंडधारक आहेत. तेथे गुजरातमधील व्यावसायिकांनी वस्त्रोद्योगाशी संबंधित उद्योग सुरू केलेले आहे. अतिरिक्त भूसंपादनात अडचणी आहेत. धुळ्यातही जागेची कमतरता आहे. साक्रीला बरीचशी शासकीय जमीन असून ती उद्योगांना देण्याची गरज आहे. तिथे नवीन औद्योगिक वसाहत झाली तर जिल्ह्य़ाच्या विकासाला चालना मिळेल.

– नितीन बंग, अध्यक्ष, व्यापारी महासंघ, धुळे

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button