TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा होतोय : लोकांनी अजून किती दिवस त्रास सहन करायचा

– राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांचा केंद्राला सवाल

– केंद्राच्या परवानगी अभावी पाईपलाईनचे काम करता येईना

पिंपरी l  प्रतिनिधी

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अनेक गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच कॅंटोन्मेंट बोर्डाची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असताना पाईपलाईन खोदण्याची केंद्र पातळीवरील परवानगी नसल्याने पाईपलाईनचे काम अद्याप काही भागात झालेले नाही. ही राजकीय अनास्था नागरिकांच्या पथ्यावर पडत आहे. लोकांनी अजून किती दिवस त्रास सहन करायचा, असा सवाल राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी केंद्र सरकारला केला आहे.

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने सन 2007 मध्ये 16 एमएलडी क्षमतेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरु केली. स्वतंत्र योजना असतानाही प्रशासकीय गोंधळ, लष्कराची केंद्र स्तरावरील परवानगी आणि अन्य कारणांमुळे काही भागात एमआयडीसीकडून पाणी घेतले जाते. काही भागात पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठा करते. काही भागात बोर्डाची पाईप लाईन नसल्याने पाणी पोहोचले नाही. या अनास्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कॅंटोन्मेंट बोर्डाने सरकारी मदतीशिवाय सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची स्वतःची नळ पाणीपुरवठा योजना सुरु केली. मात्र कॅंटोन्मेंट बोर्डाच्या गलथान कारभारामुळे निगडी येथील सिद्धिविनायकनगरी, श्रीविहार, श्रीनगरी, समर्थनगरी, दत्तनगर, आशीर्वाद कॉलनी, परमार कॉम्प्लेक्स, चिंचोली, कीन्हई, झेंडेमळा, समर्थनगर, लक्ष्मीनगर, काळोखेमळा, जाधव मळा, हगवणे मळा या भागात अजूनही पाणी योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. निगडी येथील काही भागाला महापालिका पाणीपुरवठा करीत आहे. तर काही भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

किन्हई, चिंचोली, झेंडेमळा या भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. कोटेश्वरवाडी, लक्ष्मीनगर, हगवणे मळा या भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. काळोखेमळा व जाधव मळा येथे कॅंटोन्मेंटच्या जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत. देहूरोड येथून सिद्धिविनायकनगरी भागात पाणीपुरवठा करणा-या जलवाहिन्या टाकण्यासाठी राज्य शासनाच्या योजनेतून निधी मंजूर आहे. मात्र लष्कराच्या ना हरकत दाखल्याअभावी ही काम रखडले आहे. चिंचोली, किन्हई, झेंडेमळा भागात जलवाहिन्या असताना देखील कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून ठोस काम न केल्याने नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

याबाबत युवा नेते पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. “देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील काही गावांना आजही टँकरने पाणी पुरवठा होतोय. केंद्र पातळीवरील परवानगी नसल्याने पाइपलाइनचे काम करता येत नाही. राजकीय अनास्थेमुळे लोकांनी अजून किती दिवस त्रास सहन करावा. एवढ्या वर्षात लष्कराची परवानगी केंद्रातून का मिळवता आली नाही?” असा सवाल देखील पार्थ पवार यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button