“दादा मास्क काढा…,” भाषणादरम्यान चिठ्ठी पाठवणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी सुनावलं
पंढरपूर |
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार गुरुवारी पंढरपुरात होते. अजित पवारांच्या उपस्थितीत पंढरपुरात सभा पार पडली. यावेळी भाजपा नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे भाषणावेळी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मास्क काढा अशी चिठ्ठी पाठवणाऱ्या कार्यकर्त्यालाही त्यांनी चिमटा काढला.
अजित पवारांचं भाषण सुरु असतानाच त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली. अजित पवारांनी यावेळी सर्वांसमोर चिठ्ठी वाचून दाखवत “दादा मास्क काढा, आवाज व्यवस्थित येत नाही” असं लिहिलं असल्याचं सांगितलं. “मी मास्क काढत नाही, का तर मी जनतेला सांगतोय मास्क लावा. म्हणून मी मास्क लावून बोलतोय…तरी हा शहाणा सांगतो मास्क काढा. याला काय जातं सांगायला,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्याला सुनावलं.
अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना!
दरम्यान अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपा नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावरुन अजित पवारांना भाजपा नेत्यांना टोला लगावला. “भाजपा सोडू नये म्हणून काही नेत्यांनी दोन तीन दिवस कल्याणरावांच्या घरी जाऊन बसायचे. त्याआधी कल्याणरावांची आठवण आली नाही. पण जेव्हा कळालं की, कल्याणराव काळे पवार साहेबांकडे चालले, की काही जणांच्या पोटात दुखायला लागलं. अरे तुला कुठं घालायची घाल ना…आम्हाला त्यात काय करायचं आहे,” असं अजित पवार म्हणाले. “शरद पवार साहेबांचा कल्याणराव काळे यांना निरोप आहे, की भगीरथ चांगल्या मतांनी निवडून आला पाहिजे.” असंही अजित पवार यांनी सांगितलं.