Views:
19
मुंबई | पंजाबमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ज्या प्रमाणे सिंधूसह १२२ माजी आमदार आणि मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली तशीच महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
महाराष्ट्रात पोलिसबळ मर्यादित आहे, अशावेळी आजी माजी आमदार किंवा मंत्र्यांना दिली जात असलेल्या सुरक्षेमुळे पोलीस दलावर ताण येत आहे. त्यामुळे ज्या माजी मंत्र्यांना आणि आमदारांना सुरक्षा देण्यात आली आहे, अशा लोकांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. अशी मागणी यापूर्वीही जनतेकडून केली जात होती आणि आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकार खरोखरच माजी मंत्र्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांची सुरक्षा कडून घेणार का, कारण बहुसंख्य माजी मंत्र्यांमध्ये भाजपचे लोक आहेत आणि अशा प्रस्तावाला अर्थातच त्यांच्याकडून कडाडून विरोध होईल. त्यामुळे रोहित पवार यांच्या या मागणीवर सरकारकडून विचार होईल की नाही हे सांगता येणार नाही. पण एकमात्र खरे की माजी मंत्री आणि काही नेत्यांना दिलेल्या संरक्षणाचा फेरआढावा घेणे आवश्यक आहे आणि ज्यांना खरोखरच सुरक्षेची आवश्यकता आहे, त्यांना सुरक्षा द्यायलाच हवी. मर्यादित पोलीस बळ पाहता सरसकट सर्वांनाच संरक्षण देऊ नये ही मागणी रास्त आहे.