breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

T20 World Cup 2021 : भारतासाठी अस्तित्वाची लढाई

दुबई – एक पाऊल चुकले तर अचानक दरीच्या काठावर उभे आहोत की काय हा भास व्हावा असाच अनुभव भारतीय संघाला येतो आहे. पाकिस्तान समोरचा एक सामना गमावल्याने भारतीय संघाकरता न्यूझीलंड समोरचा सामना म्हणजे जणुकाही उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला आहे. अफगाणिस्तानविरुद्धची लढत शिल्लक असली तरी ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडकामधला हा सामना म्हणजे दोनही संघांकरता अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

स्पर्धेला सुरुवात झाल्यावर पहिल्या सामन्यातील पहिल्या तीन षटकांत दोन सर्वात महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यावर भारतीय संघाचा तोल गेला. त्यानंतरची ३७ षटके भारतीय संघ प्रगतीचा मार्ग शोधायला धडपडत होता आणि पाकिस्तानचा संघ दिमाखात यशाच्या मार्गावर चालू लागला होता. फलंदाजी करताना जेवढा सामना एकतर्फी होत असल्याच्या भावना आली नाही तितकी गोलंदाजी करताना भारतीय संघाला आली. आता न्यूझीलंडविरुद्ध पाक सामन्यातील चुका टाळाव्याच लागतील.

भारतीय संघाला काय करावे लागेल?

ट्रेंट बोल्ट – टीम साउदीच्या जोडीला नव्या चेंडूवर यश मिळून न देणे आणि ईश सोधी – सँटनरच्या फिरकी जोडीला पहिल्यापासून लय न मिळू देणे. पहिली फलंदाजी असो वा दुसरी, १७० धावा करायची हिंमत ठेवणे.

गोलंदाजी करताना नवा चेंडू थोडा तरी स्वींग व्हावा या करता टप्पा पुढ्यात टाकणे. फिरकी गोलंदाजांनी गुड लेंग्थवर चेंडू न टाकणे. कारण गुड लेंग्थवर पडलेल्या चेंडूला आजकालचे फलंदाज हात मोकळे करत लांब टोलवतात.

मारू का नको अशा द्विधा मन:स्थितीत न अडकता मोठे फटके मारायची तयारी ठेवणे.

बाईज, लेग बाईज आणि वाईडच्या अतिरिक्त धावा कमीतकमी देताना एकही नो बॉल न टाकणे. तसेच सोपे असा वा कठीण सर्व झेल पकडणे.

गेल्या ५ टी २० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड त्यांच्या देशात पराभूत केले होते हे सत्य मानले तरी तो इतिहास झाला. आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ नको त्या वेळी भारतीय संघाला पराभवाचा धक्का देत आला आहे आणि ती साखळी सकारात्मक क्रिकेट खेळूनच तोडावी लागेल. त्या करता मुख्य भिस्त रोहित शर्मा, के एल राहुल आणि विराट कोहलीच्या फलंदाजीवर असेल.

नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम गोलंदाजी करायचा पर्याय निवडणार हे सगळ्यांना माहीत आहे. न्यूझीलंड संघाचा कप्तान केन विल्यमसन कोहली इतकाच नावाजलेला फलंदाज आहे. मार्टीन गुप्टीलला दुखापत झाल्याने तो खेळला नाही तर त्याचा थोडा फायदा भारतीय संघाला मिळू शकतो. न्यूझीलंड संघात बरेच चांगले अष्टपैलू खेळाडू असल्याने विल्यमसनकडे फलंदाजी असो वा गोलंदाजी जास्त पर्याय असतील.

भुवनेश्वरऐवजी शार्दूल?

बाहेरून कितीही टीका झाली तरी भारतीय संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्याला अजून एक संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दूल ठाकूरचा समावेश असा एकमेव बदल संघात होण्याची शक्यता वाढते आहे. स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्याकरता वापरली जाणारी खेळपट्टी भरपूर रोलिंग केलेली असेल. न्यूझीलंड संघाचे मोजके चाहते मैदानावर हजर राहतील ज्यांना जास्त संख्येचे भारतीय संघाचे चाहते आव्हान देतील हे पक्के असले तरी सामन्याला भारत पाकिस्तान लढतीची नशा नसेल असेही जाणवत आहे. याच कारणाने रविवारच्या सामन्याची तिकिटे अजूनही उपलब्ध असल्याचे आयसीसी स्थानिक नागरिकांना सांगत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button