breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

T20 WC : भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

अबुधाबी – मानहानीकारक पराभवाने चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या भारतीय संघाला आज योग्य वेळी सूर गवसला आणि त्यांनी अफगाणिस्तानचा तब्बल 66 धावा राखून मोठा पराभव करून टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले.

अबुधाबी येथील शेख झाईद मैदानावर झालेल्या आजच्या सामन्यात नाणेफेकीने पुन्हा एकदा कोहलीची निराशा केली आणि मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला खरा, पण हा निर्णय भारतीय फलंदाजांनी साफ चूक ठरवत तब्बल 210 धावांचा मोठा डोंगर उभा करून अफगाणिस्तान संघाला मोठे आव्हान दिले.

ज्यापुढे अफगाणिस्तान संघाचा डाव साफ कोसळला आणि फलंदाजीनंतर गोलंदाजानी आपली भूमिका चोख निभावत भारतीय संघाला मोठा विजय तर मिळवून दिलाच,सोबत आपले या स्पर्धेतले आव्हान ही जिवंत ठेवून आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या जणू विजयी शुभेच्छाही दिल्या आहेत.

प्रतिष्ठा पणाला लागलेल्या टीम इंडियाची आजची लढत अफगाणिस्तान संघासोबत होती. हाराकरी करून आपले दोन्हीही सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघावर प्रचंड दडपण होते, अर्थात ते त्यांनीच खराब खेळ करून आणलेले असल्याने आता त्यांनाच यातून मुक्त होण्यासाठी एकमेव मार्ग काढावा लागणार होता तो म्हणजे जबरदस्त मुसंडी मारून खेळ करणे.

दुर्दैवाने आजही कोहलीला नाणेफेकीचा कौल जिंकता आला नाही, अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकताच भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संघनीतीच्या विचित्र संघ निवडीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका नवोदित पण बिचाऱ्या इशान किशनला बसला आणि त्याच्या जागी सूर्यकुमार यादव तर अखेर टीम मॅनजमेंटला अश्विनला संघात घ्यायची उपरती झालीच. या दोन बदलासह कोहलीच्या संघाने आपल्या डावाची सुरुवात करताना मागील सामन्यात केलेल्या चुका टाळून रोहीत आणि राहुललाच सलामीला पाठवले,आणि त्यांनी बऱ्यापैकी सुरूवात आज तरी करून दिली.

धावगती म्हणावी तशी वेगवान नसली तरी वाईटही नव्हती, पहिल्या पॉवरप्ले अखेरीस बिनबाद 53 नंतर रशीद गोलंदाजीस आल्यावर धावगतीला आणखी खीळ बसली. त्यामुळेच दहा षटकानंतर भारताच्या 85 धावा झाल्या होत्या. पण एकही विकेट गेली नसल्याने दोन्ही सलामीवीर मुक्तपणे खेळत होते. त्यामुळेच यांनी आपली 20/20 मधली चौथी शतकी भागीदारी नोंदवली. यामुळे या दोघांचा आत्मविश्वास दुणावलेला होता, बघताबघता दोघांनीही आपले वैयक्तिक अर्धंशतक नोंदवले. रोहितचे 23 वे तर राहूलचे 13 वे टी/20मधले अर्धशतक आज या खेळीदरम्यान आले.

अर्धशतकी खेळीनंतर दोघेही जोरदार खेळायला लागले होते. रोहितचा आजचा खेळ बघता तो मोठ्या खेळीकडे सहज वाटचाल करत आहे, असे वाटत असतानाच रोहितची खेळी जन्नतने संपवली. रोहितने 47 चेंडूत 74 धावांची खेळी करताना तीन षटकार आणि आठ चौकार मारले. त्यातले दोन तर रशीदच्या एकाच षटकात मारलेले होते. यामुळेच त्यांची पहिल्या विकेटसाठी 140 ची विक्रमी भागीदारी झाली होती.

रोहित बाद झाल्यानंतर पंत खेळायला आला. त्याने राहुलसोबत पुढे आक्रमण सुरू केले, पण संघाच्या धावसंख्येत 7 धावांची भर पडलेली असतानाच राहुल सुद्धा वैयक्तिक 69 धावा करून गुलबदीनच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला, पण त्यानंतर मात्र कोहलीने स्वतः ऐवजी पंड्याला पाठवून संघहिताला प्राधान्य दिले. जे पंड्याने संपूर्णपणे सार्थ ठरवत तिसऱ्या गड्यासाठी केवळ 21 चेंडूत 63 धावांची नाबाद भागीदारी करताना या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या उभारली.

पंत आणि पंड्याने जबरदस्त फलंदाजी करताना 5 चौकार आणि तेवढेच षटकात मारत 210 ही विशाल धावसंख्या उभी करून अफगाणिस्तान पुढे मोठे लक्ष्य ठेवले. पंत 13 बॉल्समध्ये 27 तर पंड्या तेवढ्याच चेंडूत 35 धावा करून नाबाद राहिला.

एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाची त्रेधातिरपीट उडाली ती फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजांनी केलेल्या जोरदार कामगिरीमुळे. अफगाणिस्तान डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. केवळ 13 धावसंख्या असताना दोन्हीही सलामीवीर तंबूत परतले ते बुमराह आणि शमीच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे. त्यानंतरही ठराविक अंतराने अफगाणिस्तान फलंदाज बाद होत गेले.

दोन मोठया आणि लाजिरवाणे पराभव पचवल्यानंतर भारतीय संघाने मिळवलेला आजचा मोठा विजय चाहत्यांना आनंद देणारा तर इतर संघाला धोक्याचा इशारा असू शकतो, नाही का?

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button