breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘एकरकमी एफआरपी’साठी स्वाभिमानी- बळिराजा एकत्र

  • सहकारमंत्र्यांवर शेट्टींचे टीकास्त्र, आंदोलनाचाही इशारा

कराड |

राज्यातील ३०-३५ साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी द्यायला जमतं तर सहकारमंत्र्यांनाच काय अडचण? आणि कायद्याने एकरकमी एफआरपीचा हक्क असताना तो डावलला जात असेलतर तसे करणारे साखर कारखाने का सुरू होऊ द्यावेत असे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केले. ऊसउत्पादकावर अन्याय झाल्यास ऊस गळीत हंगाम जोमात असताना तो बंद पाडू असा इशाराही शेट्टी यांनी दिला. उसाच्या एकरकमी किमान रास्त दराच्या मुद्यावर ‘स्वाभिमानी’चे सर्वेसर्वा राजू शेट्टी व बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी एकजूट दाखवत संयुक्त पत्रकार परिषदेत एकरकमी एफआरपीसाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन सन २०१३ प्रमाणे सक्त आंदोलन छेडू. सहकारमंत्र्यांसह साखर कारखानदारांच्या उरावर बसू असा खणखणीत इशारा दिला. दोन्ही संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, की ज्येष्ठनेते यशवंतराव चव्हाण व पी. डी. पाटील यांचा वारसा सांगत बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. पण, शेतकऱ्यांना कायद्याने त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळवून देण्याऐवजी ते शेतकऱ्यांचे रक्षक नव्हे,तर भक्षकासारखे वागत आहेत. ते सहकारमंत्री आहेत की केवळ सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत हे समजून येत नसल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला. केवळ केंद्र सरकारचेच बरोबर आणि इतर सारे अन्यायी म्हणणाऱ्यांशी आमचे व शेतकऱ्यांचेही काही देणेघेणे नसल्याचे ते सदाभाऊ खोत यांना उद्देशून म्हणाले.

साखरेची ३,१०० रूपये किंमत धरून एफआरपी ठरवण्यात आली. मात्र, सध्या साखरेची निविदा ३,७०० रूपये दरांवर पोहचली असल्याने हा सुवर्णकाळ ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा तुटवडा असल्याने साखरदर अगदीच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखानदारांची पाचही बोटे तुपात असलीतरी त्यांच्याकडून अडचणीतील शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी एफआरपीचे तुकडे केले जात असल्याबाबत शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकरकमी एफआरपी आणि त्यावर अधिकची रक्कम मिळावी अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारने शेतीच्या नुकसानीपोटी गुंठ्याला केवळ दीडशे रुपये देऊन थट्टा केली आहे. अशावेळी एफआरपी व अधिकची रक्कम मिळून नुकसान भरून निघेल अशी आशा होती. पण, त्यावरही पाणी फिरवण्याचे काम होत आहे. साताऱ्यात आज ऊसदराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती, मात्र बाळासाहेब पाटलांमुळेच ती रद्द झाल्याचा संशय असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

  • ३० ऑक्टोबरपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन

सांगली : उसाची एकरकमी ‘एफआरपी’ देण्याची तयारी चार कारखानदारांनी दर्शवली असली तरी उर्वरित कारखानदारांवर बड्या नेत्याचा दबाव असून याबाबत ३० ऑक्टोंबरच्या बैठकीत निर्णय झाला नाही तर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सोमवारी दिला.

कोल्हापूर जिल्हृयातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबत सांगली जिल्हृयातील कारखानदारांशी संघटनेने संपर्क साधला असता चार कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची तयारी दर्शवली. मात्र अन्य कारखान्यांनी बड्या नेत्याचा दबाव असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली असल्याचे खराडे यांनी सांगितले. मात्र खासगीमध्ये एकरकमी एफआरपी देण्यास राजी असलेल्या कारखानदारांनीही अन्य काय भूमिका घेतात यावर निर्णय सोपवला आहे.

गेल्या हंगामामध्ये एकरकमी एफआरपीबाबत कडेगावमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये एकरकमी एफआरपी देण्याची तयारी दर्शवली. मात्र उदगिरी, आरग, सोनहिरा आणि दालमिया वगळता अन्य सर्व कारखान्यांनी दोन ते तीन टप्प्यात एफआरपी दिली. उसदराची कोंडी फोडण्यासाठी 30 ऑक्टोंबर रोजी संघटनेने सर्वच कारखान्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. या बैठकीत कारखान्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल असेही खराडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button