breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रियविदर्भ

सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं निधन, काँग्रेसनं राज्यातील एकमेव खासदार गमावला

  • पार्थिव दिल्लीतून नागपूरला आणणार, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा

चंद्रपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यापूर्वी त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना एअर एम्ब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचाराला प्रतिसाद देत असल्याच्या बातम्या काल दिवसभर येत होत्या. त्यामुळे ते सुखरूप परत येतील, अशी सर्वांना आशा होती. मात्र आज रात्री सव्वादोन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी १.३० वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे, आज ३० मे रोजी दुपारी २ वाजेपासून ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ३१ मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले. दुसरीकडे, एक युवा नेता अकाली गेल्याने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या संघटन कौशल्य आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी विजय खेचून आणला होता. त्यांच्या रूपाने काँग्रेसला महाराष्ट्रात खाते उघडता आले.

समर्पित कार्यकर्ता ते खासदार असा प्रवास
बाळू धानोरकर यांचं चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हाप्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यांनी लवकरच पूर्ण केला. युतीच्या सरकारच्या काळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना २००९ साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. २०१४ पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला. परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.

फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढविली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे काँग्रेसकडून चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले. लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला.

लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका , मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरले आहेत. शुक्रवार २६ मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुंतागुंत वाढल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या मेदांता हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज त्यांचे निधन झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button