breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांचे निधन

पुणे | प्रतिनिधी 
मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मराठी प्रकाशक संघाचे माजी कार्यवाह सुनील अनिल मेहता (वय ५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले दहा दिवस पुण्यातील पूना हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, बहीण आणि दोन मुले असा परिवार आहे. मेहता यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

अनिल मेहता यांनी १९७६ मध्ये स्थापन केलेल्या मेहता पब्लिशिंग हाऊसची सूत्रे १९८६ मध्ये सुनील मेहता यांच्याकडे आली. त्यानंतर अनेक दिग्गज लेखक त्यांनी संस्थेशी जोडले, प्रकाशन व्यवसायात सातत्याने प्रयोग केले. मराठीतील वि. स. खांडेकर, व. पु. काळे, द. मा. मिरासदार, आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर, रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या मान्यवर लेखकांच्या साहित्यकृतींच्या प्रकाशनासह विविध भाषांतील पुस्तके अनुवादाच्या रूपाने मराठीत आणण्याचे महत्त्वपूर्ण काम मेहता पब्लिशिंग हाऊस सातत्यने करत आहे. जेफ्री आर्चर, रॉबिन कुक, जॉन ग्रिशॅम, इयान फ्लेमिंग, डॅन ब्राऊन, झुम्पा लाहिरी अशा अनेक आंतरराष्ट्रीय, तर तस्लिमा नसरीन, सुधा मूर्ती, अरुण शौरी, खुशवंत सिंग, चेतन भगत, एस. एल. भैरप्पा, शिवराम कारंथ, गुलजार, दीप्ती नवल, अरुंधती रॉय, ओशो, किरण बेदी अशा अन्य भारतीय भाषांत लेखन करणाऱ्या लेखकांचे साहित्य अनुवादाच्या रूपाने मराठीत आणण्यात सुनील मेहता यांनी मोठे योगदान दिले. प्रकाशन व्यवसायातील नवे आयाम आत्मसात करत मराठीमध्ये ई बुक प्रकाशित करण्याचा प्रयोग सुनील मेहता यांनी सर्वप्रथम केला. तसेच फ्रँकफर्ट येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवात मराठी प्रकाशन विश्वाचे प्रतिनिधित्व केले. तर २०१२ मध्ये नॉर्वे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणारे मेहता हे एकमेव मराठी प्रकाशक होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button