ताज्या घडामोडीमुंबई

सदावर्ते यांची सात तास चौकशी, पोलीस दलामध्ये ‘अदलाबदली’

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील आंदोलनासाठी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची रविवारी पोलिसांनी सहा ते सात तास कसून चौकशी केली. सदावर्ते यांना आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, यासाठी पोलिसांकडून पुराव्यांची जुळवाजुळव केली जात आहे. त्याचबरोबर न्यायालयीन कोठडीतील आंदोलकांपैकी प्रत्यक्ष कटामध्ये सहभागी असलेल्यांचीही माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या नेपियन्सी रोडवरील निवासस्थानावर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. घरात घुसण्याचा प्रयत्न करतानाच दगड, चपलाही भिरकावण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. १०९ आंदोलकांना आणि त्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी सदावर्ते यांनाही अटक करण्यात आली. रविवारी सदावर्ते यांना दुपारी १२च्या सुमारास कोठडीतून गावदेवी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सायंकाळपर्यंत या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू होती. उपायुक्त नीलोत्पल गावदेवी पोलिस ठाण्यात दिवसभर उपस्थित होते.

दुपारी १२ वाजताच मिळाली खबर, पण

एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या वेळी उशिरा पोहोचल्याचा पोलिसांवर ठपका ठेवण्यात येत होता. यासंदर्भात पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या विभागीय चौकशीमध्ये गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्यारेलाल राजभर यांना दुपारी १२ वाजताच या आंदोलनाची माहिती मिळाली होती, असे स्पष्ट झाले आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले नाही तसेच ते स्वतःही घटनास्थळी गेले नाहीत. पोलिसांनी यासंदर्भातील अहवाल गृहमंत्रालयास दिल्यानंतर राजभर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

पोलीस दलामध्ये ‘अदलाबदली’

एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलिसांचे अपयश असल्याचे म्हटले जात आहे. त्याअनुषंगाने योगेश कुमार यांना हटवून परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदाची जबाबदारी नीलोत्पल यांच्याकडे देण्यात आली आहे. नीलोत्पल यांच्याकडील गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार बाळसिंग रजपूत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामप्यारे राजभर यांना निलंबित करण्यात आले. तर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा खळबळजनक आरोप करणारे निरीक्षक अनुप डांगे यांना पुन्हा गावदेवी पोलिस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. डांगे दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षामध्ये सध्या नेमणुकीला होते. त्याआधी ते गावदेवी पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

आरोपींची उठबस करताना दमछाक

एकाच वेळी शंभरहून आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची अलीकडच्या काळातील ही बहुधा पहिलीच घटना असेल. न्यायालयाने १०९ आरोपींची शनिवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्यांना भायखळा आणि तळोजा येथील कारागृहात नेण्यात आले. मात्र त्याआधी शुक्रवारी त्यांना आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतल्यापासून दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर कारण्यापर्यंतच्या कालावधीत त्यांची उठबस करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. यलो गेट पोलिस ठाण्याच्या आवारात या आंदोलनकर्त्यांना ठेवण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना नाष्टा, जेवण, त्यांची राहण्याची व्यवस्था तसेच दुसऱ्या गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेचे फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. या दरम्यान अटकेची प्रक्रिया करताना प्रत्येकाची ओळखपत्र तपासणे, त्यांचे मोबाइल ताब्यात घेणे, वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेणे हे सर्व करताना पोलिसांची दमछाक झाली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button