breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढल्याने महाराष्ट्रात कठोर नियमावली? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

पुणे |

महाराष्ट्रात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने सध्या चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनचे पुणे-पिंपरीमध्ये सात रुग्ण आढळले आहेत, त्यात नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तिघांसह त्यांच्या संपर्कातील तिघे आणि फिनलंडहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आठ झाली आहे. यामुळे करोनाचा उद्रेक पाहिलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कठोर नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं असून केंद्राने भूमिका घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अजित पवारांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री प्रकृतीच्या कारणास्तव येऊ शकले नाहीत असं यावेळी त्यांनी सांगितलं.

दरम्यान यावेळी अजित पवारांनी राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने नव्याने नियमावली जाहीर होणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचं यावर बारकाईनं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे जे रुग्ण येतात त्यासंबंधी केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेतली पाहिजे. जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत तिथे नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतं की नाही हेदेखील पाहिलं पाहिजे”.

“याआधीदेखील आपण मार्च महिन्यात अनुभव घेतला होता. एक दांपत्य दुबईवरुन आलं, त्यांच्यामुळे चालकाला करोना झाला आणि तेथून फोफावला. आताही देशातील इतर राज्यात एक दोन रुग्ण दिसत होते. पण त्यांच्या फक्त कुटुंब नाही तर नातेवाईकांनाही लागण झाल्याचं दिसत आहे. खूप जण काळजी घ्या, नियमांचं पालन करा, मास्क वापरा, तीव्रता कमी आहे सांगतात. पण त्याबद्दल देश पातळीवरच आरोग्य विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकदा भूमिका स्पष्ट केली पाहिजे,” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे.

पुढे बोलताना त्यांनी बोस्टर डोसचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, “ज्यांनी दोन डोस घेतले होते त्यांनाच याची बाधा झाल्याचं दिसत आहे. तर मग बूस्टर डोसची गरज आहे का? आज आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत. त्यासंबंधी देश पातळीवर निर्णय झाला पाहिजे असं वाटतं”. “बुस्टर डोससंबंधी जी चर्चा सुरु आहे त्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह आहे. तो द्यायचा की नाही याबद्दल काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. त्यासंबंधी तज्ज्ञ लोकच सांगू शकतात,” असंही ते म्हणाले.

“काल, परवा काही राजकीय लोकांच्या घरात लग्न झाली. तिथे प्रचंड गर्दी होती. हा विषाणू फार वेगाने पसरतो असं सांगितलं जात आहे. म्हणूनच देशपातळीवरुन सर्व राज्य, नागरिकांना यासंबंधीचं चित्र स्पष्ट करणं गरजेचं आहे. देशपातळीवर निर्णय झाला तर संबंधित राज्यं आपल्या नागरिकांना सर्व गोष्टींचा पुरवठा करण्यात कमी पडणार नाहीत आणि त्यात महाराष्ट्रही मागे राहणार नाही,” असं अजित पवार म्हणाले. “जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्या घऱातील लहान मुलांनाही लागण झाल्याचं कळत आहे. त्यामुळेच केंद्राने आणि जागतिक आरोग्य यांनी त्याबद्दलची स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे,” असं अजित पवारांनी शेवटी म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button