ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोकावलेल्या कैद्यांची अजब मागणी, चक्क केले उपोषण

अहमदनगर | तुरुंगात कैद्यांना हव्या त्या वस्तू मिळत होत्या. वाढदिवसही धुमधडाक्यात साजरे केले जात होते. मात्र, वाढदिवस साजरा केल्याची अशीच एक घटना पकडली गेली आणि याबद्दल चार पोलिसांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेत वस्तूंचा पुरवठा थांबविला. कैद्यांना तंबाखू, गुटखा पुड्याही मिळेनात. त्या मिळाव्यात म्हणून कैद्यांनी हट्ट धरला. त्यासाठी उपोषणही केले. मात्र, अधिकाऱ्यांच्या कडक भूमिकेपुढे त्यांना माघार घ्यावी लागली.

संगमनेर येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना खुलेआम विविध सुविधा उपलब्ध होत होत्या. तंबाखू, गुटखा पुड्या, पाण्याच्या बाटल्या, घरचे जेवण, मोबाईलची सुविधा सहज उपलब्ध होत होती. यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर सतत टीकाही होत होती. अशातच तेथे एका कैद्याने वाढदिवस साजरा केल्याचे पुढे आले. याची वरिष्ठ पातळवरून दखल घेण्यात आली. चौकशी झाली. त्यात दोषी आढळून आलेल्या चौघांना निलंबित करण्यात आले.

वरिष्ठांकडून दणका बसल्याने पोलिसांनी येथील सुरक्षा व्यवस्था कडक केली. कैद्यांना अवैध मार्गाने मिळणाऱ्या सुविधा बंद करण्यात आल्या. त्यामुळे आतमध्ये तंबाखू आणि गुटखा पुड्याही जाणे बंद झाले. कैदयांनी प्रयत्न करून पाहिले, मात्र यश येत नव्हते. त्यामुळे त्यांनी अन्नत्याग केला. जोपर्यंत पुड्या मिळणार नाहीत, तोपर्यंत जेवण नाही, अशी भूमिका काही केद्यांनी घेतली. त्यांनी खरोखरच सायंकाळपर्यंत जेवणही घेतले नाही. तंबाखू पुड्यांची मागणी करीत गोंधळ घालत होते. मात्र, अधिकारी बधले नाहीत. याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ अधिकारीही तेथे आले. त्यांनी कैद्यांना अशा सुविधा मिळणार नसल्याचे ठणकावून सांगितले. अशी मागणी करणे आणि त्यासाठी उपोषण करणे याबद्दल त्यांनी कैद्यांना फैलावर घेतले. त्यामुळे नाइलाज झालेल्या कैद्यांनी अखेर माघार घेतली. नेहमीच सवय झालेल्या या तुरुंगात आता कडक नियम किती दिवस चालतो, याकडे लक्ष लागले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button