ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विकासकामांच्या नावाखाली केली जाणारी उधळपट्टी थांबवा – बाबा कांबळे

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांची कामे काढत आहेत. यामधून नागरिकांची कामे होणार नसून निवडणुकीत फंड गोळा करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे स्थायी समितीकडून विकासकामांच्या नावाखाली होणारी उधळपट्टी थांबवावी अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात कांबळे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत सर्वसामान्य लोकांचे असंख्य प्रश्न रखडलेले आहेत. झोपडपट्टीतील समस्या, पाण्याचा अपुरा पुरवठा, ड्रेनेज समस्या, खड्डे, आदींसह अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर स्मारकासाठी वारंवार पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी अद्याप आर्थिक निधीची तरदूत केली नाही. महामाता रमाई स्मारकाची नुसतीच घोषणा करून जनतेची फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात स्मारक उभारण्यात दिरंगाई होत आहे. जागा उपलब्ध असूनही त्याचे आरक्षण हटविण्यात आले नाही. त्यामुळे तो प्रश्न प्रलंबितच आहे.

शहरातील गोरगरिबांच्या घरकुल योजना निधीअभावी थांबले आहे. घरकुलचे काम रखडले आहे. त्यामुळे हजारो नागरिक निवाऱ्यापासून वंचित राहिले आहेत. त्यासाठीची तरतूद होणे गरजेचे आहे. मात्र स्थायी समिती स्वतःचे खिसे भरण्यासाठी आणि ठेकेदार पोसण्याकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणुका जवळ आल्यामुळे व कोणत्याही क्षणी त्याचा लाभ होण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधारी हे आपले ठेकेदार आणि नातेवाईक व पक्षाला मदत करणारे फायनान्सर त्यांच्यासाठी विविध विकास कामे काढत आहेत. या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. विरोधक हातावर घडी तोंडावर बोट असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्याकडून चुकीच्या कामांना विरोध होत नाही. त्यामुळे कोटयवधी रुपयांच्या विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालावा. नवीन होणाऱ्या निधीला परवानगी देऊ नये. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button