breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; मूर्तीच्या उंचीपासून अनेक निर्बंध

मुंबई – कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सवही साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी अनेक निर्बंधांचे गणेशोत्सव साजरा करताना पालन करावे लागणार आहे.

काय आहे नियमावली

कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मर्यादेत असावी.

या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.

उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button