Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

पहिल्या दिवसापासूनचा सगळा घटनाक्रमच सांगून टाकला!; राऊतांनी बंडखोरांना कात्रीत पकडलं

मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर बंडखोर आमदार आणि पक्षाचे नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जाण्यास खासदार संजय राऊत हेच जबाबदार आहेत, असा आरोप अनेक बंडखोर आमदारांकडून करण्यात आला आहे. या सर्व आमदारांना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘आमदार बंड करून राज्याबाहेर गेले तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही हिंदुत्वासाठी हे बंड करत आहोत असं त्यांनी सांगितलं, दुसऱ्या दिवशी सरकारकडून निधी मिळत नव्हता, असा दावा केला, तिसऱ्या दिवशी आमच्या खात्यात हस्तक्षेप केला जात आहे, असं सांगितलं आणि मग चौथ्या दिवशी आम्ही संजय राऊत यांच्यामुळे पक्ष सोडला असं या आमदारांचं म्हणणं होतं. हे सर्व आमदार गोंधळलेले आहेत. त्यामुळे असे वेगवेगळे आरोप करत आहेत. या सर्व आमदारांनी अजिबात गोंधळून जावू नये, त्या सर्वांची एक कार्यशाळा घेण्यात यावी आणि त्यांनी पक्ष सोडण्याचं काहीतरी एकच कारण द्यावं,’ असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

‘त्या मंत्र्याने तर माझ्यासमोर थेट लोटांगणच घातलं होतं’

बंडखोरांच्या आरोपामुळे संतापलेल्या संजय राऊत यांनी एका-एका आमदाराचं नाव घेत पलटवार केला आहे. ‘सत्ता असताना मी कधीही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही. विधानभवन, मंत्रालय अशा ठिकाणी तुम्हाला संजय राऊत कधीही दिसला नसेल. आता काही मंत्री आणि आमदार माझ्यावर आरोप करत आहेत. मात्र आता आरोप करणारे संदीपान भुमरे हे जेव्हा २०१९ ला राज्यात महाविकास आघाडी स्थापन होऊन सरकार आलं तेव्हा सामनाच्या कार्यालयात आले आणि माझ्यासमोर लोटांगण घातलं. तुमच्यामुळेच हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो, असं भुमरे मला म्हणाले होते. संजय राठोड जेव्हा अडचणीत होते तेव्हा पडद्यामागून उद्धव ठाकरे हे ठामपणे त्यांच्या पाठिशी उभे राहिले, हे सगळ्यांना माहीत आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला कोणताही धक्का बसला नसून आजही शिवसेना जमिनीवरच आहे. हे जेव्हा भविष्यात निवडणुका होतील, तेव्हा आम्ही राज्याला आणि देशाला दाखवून देऊ, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button