ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात ब्रेक फेल झाल्याने एसटी बसची तब्बल ९ वाहनांना धडक; १ ठार, २ गंभीर

पुणे | राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे शंकर महाराज उड्डाणपुलावर एसटीची  सात दुचाकी आणि दोन कारना धडक बसली. यात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर आणि पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले. संजय कुर्लेकर (वय ५२, रा. वानवडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

शंकर महाराज उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास स्वारगेटकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. सातारा डेपोची विना वाहक विना थांबा एसटी (एमएच-०६, एस-८४६७) गुरुवारी सकाळी प्रवाशांना घेऊन स्वारगेटच्या दिशेने जात होती. त्या वेळी अचानक चालकाला ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. चालकाने एसटी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंकर महाराज उड्डाणपूल संपताना बसने सात दुचाकी आणि दोन कारना धडक दिली. धडक दिल्यानंतर एसटीचा वेग कमी झाला आणि काही अंतरावर एसटी थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते. ते सुखरूप होते. मात्र, त्यानंतर पद्मावती, शंकर महाराज मठ, बालाजीनगर परिसरात वाहतुकीचा गोंधळ उडाला होता. या अपघातानंतर उपस्थितांच्या तोंडी संतोष माने एसटी अपघाताची चर्चा होती.

 

तासभर वाहतूक कोंडी

दक्षिण पुण्याला शहराशी जोडणारा सातारा रस्ता हा मुख्य रस्ता आहे; तसेच सातारा महामार्गाने येणारी बहुसंख्य वाहनेही शहराच याच मार्गे प्रवेश करतात. सकाळची वेळ असल्याने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाहतूक, नोकरदारांची अधिक वर्दळ असल्याने अपघातानंतर शंकर महाराज उड्डाणपूल आणि बाजूच्या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. जवळपास तासभर ही कोंडी कायम होती. त्यानंतर क्रेनच्या मदतीने एसटी बस रस्त्यातून बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक धिम्या गतीने पूर्वपदावर आली.

‘उडी मारली; म्हणून वाचलो…’

शंकर महाराज उड्डाणपुलावरून येत असताना काही कळायच्या आधीच एसटीची मागून जोरदार धडक बसली. एसटीसोबत काही अंतर माझी दुचाकी फरपटत गेली. मात्र, वेळीच दुचाकीवरून उडी मारल्याने जीव वाचला, अशी भावना या अपघातात बचावलेल्या अभिजित सपकाळे या तरुणाने व्यक्त केली. अभिजितच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दुचाकीची अवस्था पाहून अभिजित मोठ्या संकटातून बचावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

चालकाचा प्रयत्न ठरला अयशस्वी

एसटीचा ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने एसटी थांबविण्यासाठी उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूच्या दुभाजकाला बाजूने बस धडकवली. मात्र, त्यानंतरही वेग कमी झाला. त्यामुळे पुढे असलेल्या वाहनांना धडक बसत गेली, अशी माहिती एसटीचे वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी दिली. आता नियमानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पथक या बसची तांत्रिक तपासणी करील. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button