धोनी बदलणार जर्सी नंबर? IPL आधी ‘7’ ऐवजी ‘8’ची चर्चा
सोशल मीडिया पोस्टनंतर चर्चांना उधाण; जडेजा कनेक्शन की मार्केटिंग स्ट्रॅटेजी?
MS Dhoni’s Number 7: आयपीएल २०२६ चा हंगाम हा चेन्नई सुपर किंग्जचा ‘थला’ महेंद्रसिंह धोनी याचा शेवटचा आयपीएल हंगाम ठरणार असल्याची चर्चा रंगली असतानाच आता धोनीच्या जर्सी क्रमांक बदलाच्या शक्यतेमुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांपासून धोनीने ‘7’ क्रमांकाची जर्सी परिधान केली असून, त्याच्यासोबत हा नंबर एक वेगळी ओळख बनली आहे. मात्र आता तो ‘8’ क्रमांक धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्रिप्टिक पोस्टने वाढवली उत्सुकता
धोनीने सोशल मीडियावर केलेल्या एका गुढ पोस्टमुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. “काही नंबर तुमच्यासोबत कायम राहतात… पण आता मी 8 नंबरकडे वळत आहे. लवकरच अधिक माहिती देईन,” असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टनंतर चाहत्यांसह संपूर्ण क्रिकेट जगत संभ्रमात पडले आहे.
या निर्णयामागे नेमके कारण काय, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते, हा एक प्रमोशनल स्टंट असू शकतो, तर काहीजण यामागे भावनिक किंवा स्ट्रॅटेजिक कारण असल्याचे मानत आहेत.
हेही वाचा – IPL 2006: सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी अभिषेक शर्माचा विचार! झालं असं की..
जडेजाशी संबंध असल्याची चर्चा
दरम्यान, काहींच्या मते हा निर्णय रविंद्र जडेजाशी संबंधित असू शकतो. जडेजा पूर्वी ‘8’ क्रमांकाची जर्सी वापरत होता. मात्र तो आता राजस्थान रॉयल्समध्ये गेल्यामुळे हा नंबर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे धोनी त्याला ट्रिब्युट देण्यासाठी हा नंबर स्वीकारू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग?
तज्ज्ञांच्या मते ही एक ब्रँडिंग आणि मार्केटिंग रणनीती असू शकते. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत जर्सी क्रमांक बदलल्यास चाहत्यांचे आकर्षण वाढण्याबरोबरच मर्चेंडाईज विक्रीलाही चालना मिळू शकते.
‘7’ नंबरचा इतिहास
बीसीसीआयने २०२३ मध्ये धोनीचा ‘7’ क्रमांक अधिकृतपणे रिटायर केला होता. यापूर्वी २०१७ मध्ये सचिन तेंडुलकरचा ‘10’ क्रमांकही रिटायर करण्यात आला होता. धोनीने आपल्या जन्मतारखेवरून (७ जुलै १९८१) हा नंबर स्वीकारला होता.सध्या तरी धोनी किंवा चेन्नई सुपर किंग्जकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र या गुढ पोस्टमुळे धोनी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.





