इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए मध्ये दुसरा चार दिवसीय सामना 7 नोव्हेंबरपासून
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पहिला कसोटी सामना खेळण्याची शक्यता कमी
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 5 मॅचची टेस्ट सीरीज 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. सध्या ‘इंडिया ए’ ऑस्ट्रेलिया टूरवर असून त्यांचे ‘ऑस्ट्रेलिया ए’ विरुद्ध सामने सुरु आहेत. इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए मध्ये दुसरा चार दिवसीय सामना 7 नोव्हेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय टीमच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल पहायला मिळू शकतो. केएल राहुल आणि ध्रुव जुरेल दोघांचा इंडिया ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी सुद्धा दोघांची टीममध्ये निवड झाली आहे. दोघांच ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळणं निश्चित आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पहिला कसोटी सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेहची याच दरम्यान प्रसुती होऊ शकते, अशी मागच्या काही काळापासून चर्चा आहे. त्यामुळे कदाचित रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. टीम इंडिया पर्थ कसोटीत नव्या ओपनिंग जोडीसह उतरु शकते. पण यशस्वी जैस्वाल सोबत या कसोटीत डावाची सुरुवात कोण करणार? हा प्रश्न आहे. इंडिया ए आणि ऑस्ट्रेलियमध्ये ए मध्ये होणाऱ्या सामन्यातून हा निर्णय होऊ शकतो. या एकाजागेसाठी केएल राहुल आणि अभिमन्यु ईश्वरन यांच्यात स्पर्धा आहे.
तोच रोहितची जागा घेईल
ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या पहिल्या चार दिवसीय सामन्यात अभिमन्यु ईश्वरन आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाडने डावाची सुरुवात केली होती. दुसऱ्या मॅचमध्ये केएल राहुल अभिमन्यु ईश्वरनसोबत ओपनिंगला येऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार राहुल आणि ईश्वरनमध्ये ओपनिंगच्या जागेसाठी थेट सामना आहे. या दोघांपैकी जो चांगलं प्रदर्शन करेल, त्याला पहिल्या टेस्टमध्ये रोहितची जागा मिळू शकते. कॅप्टन ऋतुराज गायकवाड मधल्या फळीत खेळू शकतो. जुरेलला ईशान किशनच्या जागी विकेटकिपिंगची जबाबदारी मिळू शकते.
फर्स्ट क्लासमध्ये त्याच्या नावावर 27 सेंच्युरी
केएल राहुल 2023-24 दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून टेस्टमध्ये मिडल ऑर्डरमध्ये खेळतोय. या दरम्यान त्याने 10 इनिंगमध्ये 37.66 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. राहुलला परदेशात नव्या चेंडूने खेळण्याचा अनुभव आहे. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात टेस्टमध्ये शतक ठोकणाऱ्या दोन आशियाई फलंदाजांपैकी एक आहे. राहुलला पुन्हा एकदा सलामीवीराची संधी मिळू शकते. दुसऱ्याबाजूला अभिमन्यु ईश्वरनने सुद्धा अलीकडे चांगलं प्रदर्शन केलय. फर्स्ट क्लासमध्ये त्याने 27 शतकं झळकावली आहेत.