हार्दिकच्या जागेसाठी तीन खेळाडूंना नेतृत्वाची संधी
मुंबई इंडियन्स आता पुढच्या वर्षी कर्णधार बदलणार असल्याचे समोर
मुंबई : आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाता आता मोठा बदल होणार असल्याचे समोर येत आहे. कारण हार्दिक पंड्याच्या गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सला पुढच्या वर्षी नवीन कर्णधार मिळणार असल्याचे आता समोर येत आहे. पण मुंबईचा नवा कर्णधार कोण असणार, याची उत्सुकता आता सर्वांना असणार आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी आता तीन पर्याय समोर आले आहेत.
पहिला पर्याय…
मुंबई इंडियन्सच्या संघाला एक सुवर्ण इतिहास आहे. कारण आयपीएलची पहिली पाच जेतेपदं पटकवण्याची किमया मुंबई इंडियन्सने केली होती. त्यामुळे मुंबईच्या संघाला पुन्हा एकदा तो सुवर्णकाळ अनुभवायचा असेल तर त्यांच्यासाठी सर्वात पहिला पर्याय हा रोहित शर्मा असेल. मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून काढले होते. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सची काय अवस्था झाली, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे मुंबईला गतवैभव मिळवायचे असेल, तर त्यांच्यासाठी रोहित शर्मा हा सर्वात चांगला पर्याय असेल.
दुसरा पर्याय…
मुंबई इंडियन्सचा जर रोहित शर्माला कर्णधार बनवायचे नसेल, तर त्यांच्यापुढे एक मोठा पर्याय असेल तो सूर्यकुमार यादवचा. कारण सध्याच्या घडीला सूर्याला आता भारतीय टी २० संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे जो भारताचा कर्णधार आहे, त्यालाच आपला कॅप्टन बनवण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ प्रयत्नशील असतो. सूर्या अजून ४-५ वर्षे सहजपणे क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे सूर्या हा मुंबईसाठी दुसरा चांगला पर्याय असणार आहे.
तिसरा पर्याय…
मुंबईच्या संघाला जर रोहित आणि सूर्या या दोघांनाही नेतृत्व करण्याची संधी द्यायची नसेल, तर त्यांच्यासाठी अजून एक पर्याय आहे आणि तो म्हणजे तिलक वर्मा. कारण तिलक हा संघातील युवा खेळाडू आहे. रोहित आणि सूर्या यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला पैलू पाडले जाऊ शकतात. कारण तिलक हा ५-६ वर्षे तर क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे पुढच्या ५-६ वर्षांचा जर मुंबईचा संघ विचार करत असेल तर त्यांच्यासाठी तिलक वर्मा हा एक चांगला पर्याय असू शकतो.
मुंबईच्या संघाने गेल्या वर्षी हार्दिकला कर्णधार केले आणि त्यानंतर त्यांना जोरदार ट्रोल करण्यात आले. हार्दिकला तर प्रत्येक सामन्यात डिवचले गेले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंतच्या प्रतिमेला थोडासा धक्का नक्कीच लागला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हार्दिकच्या जागी एक नवा कर्णधार मुंबईचा संघ आणू शकतो आणि पुन्हा एकदा आपले चाहत्यांच्या मनातील स्थान मिळवू शकतो, असे सध्याच्या घडीला दिसत आहे. मुंबईकडे सध्याच्या घडीला कर्णधारपदासाठी तीन पर्याय आहेत. या तीनपैकी नेमका मुंबईचा कर्णधार कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना असेल.