वॉर्नरवादळाचे आव्हान!

- श्रीलंकेची ऑस्ट्रेलियाशी आज महत्त्वपूर्ण लढत
दोन सामने पावसामुळे रद्द झाल्यानंतर श्रीलंकेला दोन गुणांचा बोनस मिळाला असला तरी शनिवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात त्यांना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दमदार फलंदाजांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी केली असून शनिवारी त्याचाच धोका श्रीलंकेसमोर असेल.
सलामीच्या लढतीत न्यूझीलंडने धुव्वा उडवल्यानंतर श्रीलंकेने अफगाणिस्तानला पराभूत करत विजयाचे खाते खोलले. मात्र ४ जूननंतर श्रीलंकेला एकदाही मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. बांगलादेश आणि पाकिस्तान या आशियाई संघांविरुद्धचे सामने पावसामुळे रद्द झाल्यामुळे १९९६ सालचा विश्वविजेता श्रीलंका संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा पराभव वगळला तर आतापर्यंत शानदार कामगिरी करून आपणच सहाव्यांदा विश्वविजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहोत, हे दाखवून दिले आहे. चार सामन्यांत तीन विजय मिळवणारा ऑस्ट्रेलिया संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर बहरात आला असून त्याने गेल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियाला ३००पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. वॉर्नर सध्या आक्रमक पवित्र्यात नसला तरी त्याने पाकिस्तानविरुद्ध साकारलेली १०७ धावांची संयमी खेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची ठरली होती. कर्णधार आरोन फिंचनेही चार सामन्यांत दोन अर्धशतके साजरी करत वॉर्नरला चांगली साथ दिली आहे.
श्रीलंकेच्या गोलंदाजीची मदार मलिंगावर
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा सासूच्या निधनामुळे मायदेशी जाऊन परतला असला तरी तो शनिवारच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावरच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी असेल. दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला असून त्यांना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध ५० षटकेही फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे श्रीलंकेला फलंदाजीच्या या समस्येवर मात करावी लागेल.