breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपराष्ट्रियलेख

क्रीडा समीक्षण: थोडक्यात बचावलो ; अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच !

दक्षिण आफ्रिके विरुद्ध पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय संघाचा सामना आज ऍडलेड ओव्हल ला बांगलादेश विरुद्ध झाला. स्पर्धेवर असणारे पावसाचे सावट आणि आफ्रिके विरुद्धचा पराभव यामुळे कुठलाही सामना सोप्यात घेणे भारतासाठी परवडणारे नव्हते. तुलनेने कमकुवत बांगला देश संघा विरुद्ध सामना असला तरी पावसाच्या शक्यतेमुळे बाद फेरी गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणे आत्यावश्यक होते.गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने आज काही काळ विश्रांती घेतली पण खेळपट्टी सतत कव्हर्ड असल्याने व्यवस्थित रोलिंग नसल्याने जरा हिरवी दिसत होती आणि ढगाळ वातावरणात सुरवातीला वेगवान गोलंदाजी ला साहाय्य करणार हे स्पष्ट होते. बांगलादेश ने टॉस जिंकून अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताने हुडा ला वगळून अक्षर पटेल ला संघात घेतले.

गोलंदाजाना अनुकूल अश्या वातावरणात राहुल आणि रोहित ने सावध सुरवात केली.ओलसर खेळपट्टी वर फलंदाज वारंवार चकत होते आणि त्यातच हसन मेहमूद ने फाईन लेग ला रोहित चा सोप्पा झेल सोडला पण त्याच हसन मेहमूद ने लगेचच स्वतःच्या गोलंदाजीवर अडखळणाऱ्या रोहित ला बाद करून सुटकेचा निश्वास सोडला आणि झेल सोडल्यावर रडवेल्या झालेल्या चेहऱ्यावर स्मितहस्य पसरले.सुरवातीला चाचपडणाऱ्या राहुल ने आधी स्कवेअर लेग आणि मग कव्हर्स वरून नेत्रदीपक षटकार मारून आपला आत्मविश्वास परत येत असल्याची चुणूक दाखवली.काही दिवसापूर्वी ज्याचे उत्कृष्ट फटके सुद्धा थेट क्षेत्रारक्षकांच्या हातात जात होते त्या विराट वर क्रिकेट देव आता मेहेरबान झाल्याने हवेत उडालेले फटके सुद्धा क्षेत्रारक्षकांना आरामात चकवत सीमापार होत होते.राहुल ने पण मग अचानक गियर बदलला आणि नवव्या षटकात चोवीस धावा वसुल केल्या. मात्र नंतर लगेचच तो एकतीस चेंडूत पन्नास धावा काढून बाद झाला.त्यानंतर भारताचा सध्याचा फलंदाजीचा सूर्य अवतारला आणि अचानक बांगलादेशी गोलंदाजी एखाद्या क्लब सारखी वाटायला लागली. मागच्या दहा डावात जेव्हा सूर्या नी अर्धशतक झळकावलंय तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट दीडशे च्या वर आहे.झटपट तीस धावा करून फटकेबाजीच्या नादात तो बाद झाला आणि त्या पाठोपाठ हार्दिक आणि कार्तिक ही स्वस्तात परतले.फॉर्म मध्ये परतलेल्या विराट ने मात्र एक बाजू लावून धरत एकसष्ट धावांची वेगवान खेळी केली आणि भारताला एकशे चौऱ्याशी धावांचं आव्हान उभं करून दिलं. बांगलादेश कडून मोहम्मद हुसैन ने तीन बळी मिळवले आणि कर्णधार शाकिब ने ही अचूक गोलंदाजी केली.

धावांचा पाठलाग करताना लिट्टन दास ने बांगला देश ला धमाकेदार सुरवात करून सहाव्या षटकातच स्वतःचे आणि संघांचे अर्धशतक धावफालकावर लावले आणि भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांना घाम फोडला.त्यातच वरुणराजाने अचानक हजेरी लावली आणि डकवार्थ लुईस स्कोर प्रमाणे बांगलादेश पंधरा रन्स पुढे होते.सुदैवाने पाऊस थांबला आणि बांगला देश ला एकशे एकावन्ना धावांचा लक्ष्य मिळालं.पावसा आधी भारतीय गोलंदाजी ची पिसं काढणारा लिट्टन दास लग्गेच बाद झाला आणि बांगलादेश ची पडझाड सुरु झाली.शेवटच्या षटकात वीस धावा हव्या असताना हसन ने अर्शदीप ला षटकार आणि चौकार मारून सामन्यात रंगत आणली मात्र अखेरीस भारत विजयी झाला आणि पराभवा पेक्षा जास्त घातक अश्या नागीन डान्स बघण्यापासून आणि अथर अली खान च्या बष्कळ बडबडी पासून भारतीय पाठीराखा्यांची सुटका झाली.अर्शदीप आणि हार्दिक ने दोन तर शमी ने एक बळी मिळवला.

भारत जरी जिंकला असला तरी बांगला देश नी दिलेली झुंज कौतकास्पद आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ने भारताला तारले असे म्हणता येईल.राहुल ने जरी अर्ध शतक झळकावले असले तरी powerplay मध्ये तो आणि रोहित खूपच संथ खेळत आहेत. बलाढ्य संघा विरुद्ध ते घातक ठरेल.रोहित धावा काढायला झगडतोय.राहुल पण सुरवातीला चाचपडत होताच. फलंदाजी पूर्णपणे सूर्या आणि विराट वर अवलंबून आहे. पहिले दोघे आणि हार्दिक आणि कार्तिक यांना योगदान द्यावे लागेल. अश्विन संघात असावा कि नाही याचा विचार करावाच लागेल.चहल ला संधी दिली जाऊ शकते आणि अक्षर च्या जागी पंत चा समावेश केला जाऊ शकतो. एकंदरीत भारत जिंकला पण विश्वाविजेत्या संघा सारखी कामगिरी नक्कीच नाही केली.!

– सुनील शशिकांत शाळगावकर.

– क्रिकेट प्रशिक्षक, 9850217509

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button