मुंबई : मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्याच विभागांतून आमदार फोडून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडलं आहे. मातोश्रीचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ भाईंचे विश्वासू रविंद्र फाटक यांनी चर्चा केल्यानंतर शिंदे यांचं समाधान झालं नाही. आम्ही दिलेल्या ऑफरवर शिवसेना नेतृत्वाने विचार करावा नाहीतर परतीचे दोर कापले आहेत असं समजावं, असा थेट निरोपच त्यांनी नार्वेकरांमार्फत उद्धव ठाकरेंना कळवला.
विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या बाईटमधून एकनाथ शिंदे हे माझ्याजवळ ४० आमदारांचं पाठबळ आहे, असं सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खिळखिळी केल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. शिंदेशाहीच्या शक्तीप्रदर्शनापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हतबल आहेत. अशातच सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरु असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन बायो हटवल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.