breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

क्रीडामंत्री शहरात आले पिंपरी-चिंचवडमधील महाविकास आघाडीला कळलेच नाही?

  •  रोईंग स्पर्धेला राज्याचे क्रिडामंत्री सुनील केदार यांची भेट
  • काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना मागमूस नाही

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार शहरात आल्याचा मागमूसही नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता एकही मंत्री अथवा नेत्यांच्या स्वागताला महाविकास आघाडीचे स्थानिक नेते एकत्र येत नाहीत. त्यामुळे महापालिकेत महाविकास आघाडीचा झेंडा कसा फडकरणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कासारवाडी, पिंपरी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आर्मी रोईंग नोड येथे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी ३९ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशीप स्पर्धेला भेट दिली. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सीएमई रोईंग नोडचे कमांडींग ऑफीसर कर्नल संदीप चहल, रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाचे तहहयात अध्यक्ष कर्नल (निवृत्त) सी.पी. सिंग, रोईंग क्रीडा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पंच स्मिता शिरोळे-यादव आदी उपस्थित होते.

क्रीडामंत्री सुनील केदार हे राज्याचे पशुसंवर्धन, दूग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. काँग्रेसच्या तिकीटावर सावनेर विधानसभा मतदार संघातून केदार निवडून आले आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिघांचे महाविकास आघाडी सरकार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे राजकीय चित्र असताना पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी दिसत नाही.

काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष कैलास कदम यांनी आक्रमकपणे भाजपाविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीही आपआपल्या परिने बाजू लावून धरली असली तरी महाविकास आघाडी म्हणून माहोल दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद विखुरली असून, महापालिका निवडणुकीत फटका बसणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि आणि स्थानिक नेत्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव याला कारणीभूत ठरणार आहे.

  • अजित पवारांचे लक्ष ; महाविकास आघाडीचे दुर्लक्ष…

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा प्रतिनिधी अथवा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा अपवाद वगळता महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याला औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमधील समस्या, प्रश्नांबाबत घेणे-देणे नाही. ५०० चौरसफूटापर्यंतच्या निवासी मिळकतींचा मिळकतकर माफ करण्याबाबत गेल्या २ वर्षांपासून राज्य सरकारकडे प्रस्ताव पडून आहे. मुंबई महापालिका हद्दीतील मिळकतींचा कर माफ करण्याची घोषणा करण्यात आली. पण, पिंपरी-चिंचवडबाबत एकाही नेत्याने आवाज उठवला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ अजित पवार यांचे लक्ष आहे. पण, महाविकास आघाडीचे दुर्लक्ष होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

  • महाविकास आघाडीची मोट बांधणारा नेता हवा…

पिंपरी-चिंचवडमधील महापालिकेत सत्तांतर करण्यासाठी आता महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांची मोट बांधण्याची क्षमता असलेल्या नेत्याची शहराला गरज आहे. भाजपा आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांना तोडीस-तोड स्थानिक नेता भाजपाविरोधी स्थानिक नेत्यांची मोट बांधू शकला तर महापालिकेत भाजपाचा पराभव करणे सोपे होणार आहे. त्यासाठी प्रदेश पातळीवर तीनही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी स्थानिक नेतृत्त्वाला ताकद देणे अपेक्षीत आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे, सेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, काँग्रेसकडून शहराध्यक्ष कैलास कदम, माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी एकत्र बसून महाविकास आघाडीचा स्थानिक चेहरा म्हणून एखाद्या नेतृत्त्वाला समर्थन दिल्यास भाजपासमोर आव्हान निर्माण होवू शकते. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचा स्थानिक चेहरा कोण? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button