breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“स्पेशल थँक्स टू नवाब मलिक आणि संजय राऊत”; देशमुखांच्या अटकेनंतर राणेंची प्रतिक्रिया

मुंबई |

राज्य पोलीस आस्थापनातील कथित खंडणी रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात १२ तासांहून अधिक चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली. चौकशीदरम्यान राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख टाळाटाळ करत असल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यांना मंगळवारी येथील न्यायालयात हजर केल्यानंतर ईडी त्यांची कोठडी मागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी सकाळी ११:४० च्या सुमारास दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट भागातील ईडी कार्यालयात आपल्या वकील आणि सहकाऱ्यांसह हजर झाले होते. दरम्यान काही वेळ विश्रांती दिल्यानंतर ईडीने त्यांची चौकशी सुरूच ठेवली होती.

त्यानंतर रात्री उशिरा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक करण्यात आली. अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर रात्री भाजपा आमदार नितेश राणे यांनी खोचक टीका करणारं ट्विट केलं आहे. “अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस?”, असे ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. “अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस?, स्पेशल थँक्स टू नवाब मलिक आणि संजय राऊत”, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले होते. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.

  • नेमकं प्रकरण काय?

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २१ एप्रिलला या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ११ मेला ईडीने या प्रकरणी देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने यादीतील बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये चार कोटी ७० लाख रुपये जमा केले होते. अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेने केला होता. देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते.

बार मालकांकडून घेतलेली चार कोटी ७० लाख रुपयांची रक्कम ही तीच असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्यामार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवालामार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे. यावेळी वाझेने ही रक्कम १ नंबरसाठी घेत असल्याचे सांगितल होते. या प्रकरणी देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित चार कोटी २० लाखांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. ईडीने देशमुख व कुटुंबीयांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नियंत्रण असलेल्या २४ कंपन्यांची ओळख पटवली आहे. या कंपन्यांमध्ये आपापसात पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याच प्रकरणात ईडी अधिक तपास करत आहे.

या प्रकरणी ईडीने आतापर्यंत देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय साहाय्यक कुंदन शिंदे यांना २६ जूनला अटक केली होती. ते देशमुख यांचे सर्व व्यवहार पाहत असल्याचा संशय ईडीला आहे. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाचवेळा समन्स पाठवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button