breaking-newsTOP Newsपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडलेख

विशेष लेख : ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’, ‘मैत्र जीवाचे’ हाच जीवनमंत्र जपणारे प्रा. अनिल कुलकर्णी

एखादया सेवेतून निवृत्त होणे ही काळाच्या ओघात घडणारी घटना आहे. नोकरीला लागणं आणि निवृत्त होणं हे अनेकांच्या जीवनात घडत असतं. पण या दोन टोकादरम्यानच्या काळात तुम्ही काय केलं हे खूप महत्वाचं असतं. निवृत्तीच्या काळापर्यंत तुम्ही तुमच्या सेवेत काय केलं यावर निवृत्तीचं महत्व आणि निवृत्तीनंतरचा काळ अवलंबून असतो. निवृत्ती हे अवस्थांतर आहे पण वृत्तीतला बदल नाही. म्हणजे एखादी व्यक्ती सेवेतून निवृत्त होते म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाते पण तिची वृत्ती तीच राहते. ती बदलत नाही. आणि तुम्ही हाडाचे शिक्षक असाल तर हे अधिकच खरं असतं. निवृत्ती ही फक्त औपचारिक सेवापुर्ती असते, शिक्षक ही वृत्ती अखंड राहते. ही चर्चा करायचं निमित्त आहे प्रा. अनिल गणेश कुलकर्णी या शिक्षकाचं सेवानिवृत्त होणं. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर (खेड) येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात प्रा. कुलकर्णी सरांनी ३७ वर्षे इंग्रजीचे अध्यापन केले. या महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे प्रमुख म्हणून सरांनी अतिशय सक्षमपणे कार्यभार सांभाळला. दोन दिवसापूर्वी म्हणजे ३१ मे, २०२१ रोजी सर निवृत्त झाले.

गेल्या वीस वर्षांपासून माझे आणि कुलकर्णी सरांचे ऋणानुबंध आहेत. आम्ही इंग्रजीचे प्राध्यापकं सरांना प्रेमाने एजी (A. G.) म्हणतो. अनेक प्रसंगात आम्ही एकत्र होतो. मला आठवतं नारायणगावावरून पुण्याला जाताना राजगुरूनगर कॉलेजला माझा थांबा ठरलेला असायचा. कॉलेजमध्ये जाऊन कुलकर्णी सरांशी गप्पा मारायच्या हे ठरलेलं असायचं. पुढे पुढे हे नित्याचंच झालं. कॉलेजमध्ये गेल्यावर लक्षात यायचं की सर अजूनही वर्गातच आहेत आणि मुलांना शिकवतायत. इंग्रजीच्या विभागात वाट बघत बसलं की थोड्या वेळाने सर यायचे. येताना प्रा. हेमंत चव्हाण सर त्यांच्याबरोबर असायचे. मग कॉलेज कँटीनला मस्त चहा नाश्ता घेत गप्पा होतं. चव्हाण सर आणि एजी सर दोघेही विरुद्ध स्वभावाचे. दोन्ही टोकंच. चव्हाण सर मनात येईल ते पटकन बोलणारे, फटकळ. सतत तूलना करत राहणे हा त्यांचा स्वभाव. एजी सर मोजकंच आणि विचार करुन बोलणारे. या दोघांना एकत्र ऐकणं हा माझ्यासाठी अनूभवच असायचा. मला नवल वाटायचं की हे दोघे एकत्र कसे काय राहू शकतात. दोघांनाही एकमेकांबद्दल खूप आदर आणि कौतूक. मी कधीही एजींना चव्हाण सरांविषयी किंवा चव्हाण सरांना एजींविषयी वाईट बोलताना ऐकलं नाही. आपल्या सहकार्‍यांशी कसं वागावं याचा आदर्श एजींना घालून दिला. एजी अजातशत्रू. म्हणजे आधी मला या शब्दाची गंमत वाटायची पण एजींना भेटल्यावर हा शब्द मला खरा वाटला. त्यांचे सर्वांशी अतिशय स्नेहशील संबंध. लहान-थोर असा भेदभाव एजींनी कधीच केला नाही. खरं तर कसलाच भेदभाव एजींनी केला नाही. त्यांच्यासाठी जणू ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’. ‘मैत्र जीवाचे’ हाच त्यांचा जीवनमंत्र. कधीकधी तर राग येईल इतकं चांगूलपण, सौजन्य एजी दाखवायचे. पण असं सौजन्यशील असणं ही त्यांची जीवन जगण्याची पद्धतच आहे.

विद्यार्थी हा एजींच्या जगण्याचा केंद्रबिंदू. या वाक्यात जराही अतिशयोक्ती नाही. सतत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत राहणे, वेळी अवेळी मदत करणे, त्यांना समजावं यांसाठी धडपड करणे हेचं एजींचं जीवन होतं. त्यांच्या विद्यार्थी प्रेमाचा मी स्वत: अनेकवेळा अनूभव घेतला आहे. शिकवणे ही गोष्ट एजींनी व्रत म्हणून निष्ठेने जोपासाली. आपण शिकवतोय ते विद्यार्थ्यांना कळायला हवं यांसाठी त्यांचा आटापिटा चाललेला असायचा. एखादी संकल्पना मुलांच्या गळी उतरेपर्यंत ते शिकवत राहायचे. काय वाचायला/लिहायला पाहिजे ते सतत सांगत राहायचे. मला एम. ए. च्या वर्गाला शिकविण्यासाठी एजींनी मोठ्या आस्थेनं बोलावलं होतं. अनेकवेळा एजी माझ्या वर्गात बसायचे. मी काय शिकवतोय ते ऐकायचे. क्वचित चर्चा व्हावी म्हणून एखादा मूद्दा मांडायचे. त्यांच्या वर्गात असण्यानं मला संकोचल्यासारखं व्हायचं. इतका सिनियर प्राध्यापक आणि उत्तम शिक्षक आपल्या वर्गात बसतोय याचं सुरवातीला दडपण यायचं. पण नंतर त्याचा अभिमान वाटायला लागला. इतका मोठा शिक्षक आपल्यांसाठी वर्गात बसतो हे मला भूषण वाटायचं. खरं तर हा एजींच्या मनाचा मोठेपणा. कोणत्याही सिनियर प्राध्यापकाने आपल्या सहकार्‍याच्या वर्गात बसायचं नाही आणि नवं काही सांगायचं नाही आणि शिकायचं नाही अशी सर्वदूर समजूत आपल्या व्यवस्थेत रुजलेली आहे. आपण क्वचितच एकमेकांना ऐकतो आणि समजून घेतो. असं असताना एजींनी मात्र माझ्यासारख्या ज्युनियर शिक्षकाच्या वर्गात बसून मला उर्जा दिलीच, पण एक आदर्शही घालून दिला. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम मिळावं याची त्यांना आस लागलेली असायची. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षकं, चांगली पुस्तकं मिळावीत यांसाठी असलेली त्यांची धडपड मी अनेक वर्षे जवळून अनूभवली आहे. विभागाच्या शिक्षकांना बसायची हक्काची जागा मिळावी आणि विद्यार्थ्यांसाठी लँग्वेज लॅब तयार व्हावी यांसाठी एजींना खिंड लढवताना मी बघितलं. विद्यार्थी त्यांची मूलं आणि काॅलेज त्यांचं घर होत. पालक आपल्या मुलांची जेवढी काळजी घेत नसतील तेवढी एजी विद्यार्थ्यांची काळजी घ्यायचे. हा सिलसिला फक्त वर्गापूरताच मर्यादित नसायचा. हे वर्गाबाहेर अनेकांना मदत करण्यापर्यंत असायचं. एजी अनेकवेळा विद्यार्थ्यांच्या हितासाठी अभ्यासक्रम, पूस्तकांची उपलब्धता, प्रश्नपत्रिकांचे स्वरुप अशा अनेक विषयांवर जीव तोडून बोलायचे आणि तेव्हा माझ्यासह ऐकणार्‍यांना या विषयांचं महत्व कळायचं. मला तर प्रत्यक्ष आणि फोनवर त्यांच्या अनेक शंका, प्रश्न आणि सल्ले असायचे. त्यांच्या अशा काळजीचा आम्हा सगळ्यांना नेहमी उपयोगच झाला. मुलांनाही त्यांच्याविषयी आदर असायचा. एजींना मूलांची मानसिकता, त्यांना काय हव नको ते बरोबर कळायचं. तसंच शिक्षकांची नाडी ते बरोबर ओळखत. याचा चर्चा करताना, शिकवताना, अभ्यासक्रम तयार करताना, प्रश्नपत्रिकांचं स्वरुप ठरवताना मला आणि इतरांनाही खूप फायदा झाला. म्हणूनच मला एजी इंग्रजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे रिफ्लेक्टर वाटायचे. एजींनी विद्यार्थी आणि काॅलेजसाठी स्वत:ला इतकं झोकून दिलेलं होतं की त्यापायी त्यांनी ना स्वत:च्या प्रगतीसाठी वेळ दिला ना कुटुंबासाठी. भोवताली सगळे काॅन्फरन्स/सेमिनार्समधे रिसर्च पेपर्सचे सादरीकरण करत होते, पब्लिकेशन्स करुन स्वत:चा एपीआय स्कोर वाढवत होते तेव्हा एजी मुलांना शिकविण्यात दंग होते. एजींनी पीएच. डी. करावं असं मला सतत वाटायचं. पण त्यांचा सगळा जीव विद्यार्थ्यांमधे आणि काॅलेजमधे अडकलेला असायचा. नाही हो म्हणता एकदोन वेळा पीएच. डी. करण्यासाठी ते तयारही झाले. विषय अर्थातच त्यांच्या आवडीचा आणि वेगळा. पण काही अपरिहार्य घटनांमूळे त्यांना संशोधनाचं काम पुढे नेता आलं नाही. खरं तर एजींनी एम. फील. पुर्ण केलं होतं. आणि अगदी चांगल्या विषयावर आणि उत्तम तर्‍हेने संशोधन केलेलं होतं. म्हणूनच त्यांनी पीएच. डी. करावं असं मला वाटायचं. त्यांना साहित्याची उत्तम जाण आहे, विश्लेषण करायची क्षमता आहे आणि वेगळा विचार करायची दृष्टी आहे. संशोधनाला यापेक्षा अधिक काय लागतं? याशिवाय भोवताली अगदी बेताची संशोधन क्षमता असलेले लोकं पीएच. डी. डिग्री मिळवत होते. कारण त्यातून डाॅक्टर हे मानाचे बिरुद मिळते आणि घसघशीत इन्र्किमेंट मिळते. पण एजींनी अशा अर्थिक फायद्याकडे आणि फसव्या प्रतिष्ठेकडे कधीच लक्ष दिले नाही. ठरवलं असतं तर अशा पदव्या आणि अनुषंगिक फायदे एजी सहज मिळवू शकले असते. पण त्यांनी शिकविणे आणि त्यांचे विद्यार्थी यांनाच प्राधान्य दिले. एजी बहुतेक वेळा दिवसभर काॅलेजवरच असायचे. पुण्याहून परत येताना दुपारी चार-पाच वाजता फोन केला तर एजी एम. ए. च्या मुलांना शिकवत असायचे. एजींना मी काम टाळताना किंवा नियम डावलताना कधीच बघितलं नाही. राजगुरुनगर काॅलेजचं नॅकचं अवघड आणि जोखमीच काम सरांनी अनेक वर्ष केलं. राजगुरुनगर काॅलेजची साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमाला उभी करण्यात आणि तिला आजचं प्रतिष्ठित रुप मिळवून देण्यात एजींचा सिंहाचा वाटा आहे. एजींना वक्तृत्वाची आवड. साहजिकचं अशा व्याख्यानमालेत त्यांनी समर्पित भावनेन काम केलं. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी या व्याख्यानमालेत हजेरी लावली आहे. आता ही व्याख्यानमाला म्हणजे या महाविद्यालयाची पंचक्रोशीत ओळख बनली आहे. ज्ञानाचा अखंड चालणारा प्रवाहच एजींच्या प्रयत्नातून साकारला आहे. या सगळ्या धावपळीत त्यांच्या तब्येतीची हेळसांड झाली आणि अर्थिक फायदे किंवा पद देणारं करीयर त्यांना करता आलं नाही. पण याविषयी त्यांची तक्रार नसायची. उलट हे सगळं ते आनंदानं करायचे. पुण्यात पेपर तपासणीवेळी आम्ही खूप वेळा एकत्र असायचो. मला तेव्हाही सरांचा असाच अनूभव यायचा. पैसे मिळवण्यांसाठी म्हणून एजी कधीच पेपर तपासायला आले नाहीत. बरेच वेळा तर पेपर तपासणी ही त्यांच्यासाठी पदरमोडच असायची. प्रवासाचे तरी पैसे निघावेत एवढाही व्यवहारी विचार त्यांच्या मनाला शिवत नसे. शिवाय पेपर तपासणीही काटेकोर आणि निर्दोष. मुलांचं नूकसान होवू नये आणि चूकीचं पाठीशीही घालू नये यांसाठी ते फार दक्ष असायचे. अनेकवेळा आम्ही चहा/नाश्त्यासाठी हाॅटेलमधे जायचो तेव्हा एजी बील देण्यासाठी सर्वात पुढे असायचे. एकूण अर्थिक लाभाविषयी उदासीनता, मनमोकळा स्वभाव आणि इतरांना सतत मदत करायची वृत्ती एजींमधे उपजतच आहे.

एजींच्या अजून दोन गोष्टींचा उल्लेख मला करावा वाटतो. एक म्हणजे त्यांचा क्रिकेटचा छंद आणि दुसरं म्हणजे कवितेचं वेड. ते लहानपणापासून क्रिकेट खेळायचे. त्यांच्यातली खिलाडू वृत्ती, सगळ्यांना सामावून घ्यायचं टीम स्पिरीट आणि प्रतिकूल स्थितीत मन स्थिर ठेवण्याची क्षमता त्यांच्या क्रिकेटच्या छंदामधून आलेली असावी. जर क्रिकेटनं त्यांना मनाचा उमदेपणा आणि प्रसन्नता दिली असेल तर कवितेन मनाचा हळवेपणा आणि संवेदनशीलता दिली. एजींना कवितेचं अनिवार वेड आहे आणि कविता हा आमच्यामधला काॅमन इंटरेस्ट. मर्ढेकर आणि बोरकर एजींचे अतिशय आवडते कवी. शेक्सपियर, वर्डस्वर्थ, यीटस हे त्यांचे इंग्रजीतले आवडते कवी. पण एजींचं कविता वेड दुसर्‍यांच्या कविता आवडण्यापूरतं मर्यादित नाही. ते स्वत: उत्तम कवी आहेत. त्यांच्या काही कविता अतिशय कसदार आहेत. अनेकवेळा त्यांच्या घरी किंवा कँटीनमधे वाफाळता चहा आणि भज्यांसोबत त्यांच्या उत्तमोत्तम कवितांचा मी आस्वाद घेतलाय. अशा आमच्या अनेक मैफिली झाल्या आहेत आणि तेव्हाचे अतिशय संवेदनशील, भावूक एजी मी अनुभवले आहेत. इथेही पुन्हा त्यांचा चांगूलपणा, फक्त कवितेपूरती असलेली निष्ठा ठळकपणे जाणवत राहिली. एजींनी प्रचारकी थाटाच्या कविता लिहिल्या नाहीत. कुठे त्यांचं उठावदार सादरीकरण करुन टाळ्या मिळवल्या नाहीत. त्यांंना कंपूशाहीचा विलक्षण तिटकारा आहे. त्यामूळे कवी संमेलंनात मिरवण्यात त्यांंना कधीच रस नव्हता. दुसरं म्हणजे त्यांनी त्यांच्या कविता प्रकाशित केल्या नाहीत. यांतही ते निर्लेप, प्रसिद्धीपासून दूर राहिले. अनेकवेळा त्यांना आग्रह करुनही कवितेचं पूस्तक काढायचं एजींनी मनावर घेतलं नाही.

खूप क्षमता असूनही एजी नेहमीच लो प्रोफाईल राहिले. संशोधन करण्याची क्षमता, मोठ्या पदावर जायची क्षमता, मोठ्या व्यासपीठावर जावून उत्कृष्ट कवी व्हायची क्षमता. पण या सगळ्यांचा एजींनी स्वत:च्या फायद्यासाठी कधीही उपयोग केला नाही. या सर्व क्षमता त्यांनी शिकवण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि काॅलेजच्या भल्यासाठी वापरल्या.

खरं तर आजच्या इन्स्टंट आणि उथळ गोष्टींच्या जमान्यात आयुष्यभर फक्त समर्पित आणि उत्कृष्ट शिक्षक असणं ही उत्सव करावा अशी गोष्ट नाही का? सर्व प्रकारची फसवेगिरी आणि पैशांचा लोभ असलेल्या माणसांच्या गर्दीत कोणतीही गोष्ट नि:स्पृहपणे करणारा माणूस कौतूकास पात्र नाही का? शिक्षक ही मूलाला घडविणारी नितांत सुंदर मानसिकता आहे. निर्व्याज आणि निखळ माणूस असणं हे दुर्मिळ जीवन आहे. एजी हे दोन्हीही आहेत. आजच्या काळात त्यांच्यासारखा समर्पित शिक्षक आणि निखळ माणूस शिक्षण व्यवस्थेतून निवृत्त झाला ही घटना कालानूक्रमे घडणारी आहे. पण त्यामूळे शिक्षणव्यवस्थेतून एक सर्जक शिक्षक आणि एक सुंदर मन बाजूला झाले हे अधिक वेदनादायक आहे. चांगूलपणं दुर्मिळ झालेल्या काळात एजींचं निवृत्त होणं व्यवस्थेला अधिक दुबळं करणारं आहे. एजींनी घडवलेले अनेक विद्यार्थी त्यांच्या सौजन्य आणि समर्पणाची परंपरा पुढे चालू ठेवतील हे नक्की.

एजींनी कौटुंबिक पातळीवरही फार मोठी भूमिका पार पाडलेली आहे. त्यांच्या आईच्या पश्चात त्यांनी वडिलांना व्यवस्थित सांभाळून, लहान भाऊ आणि इतर सर्वांसोबत जिव्हाळा कायम ठेवला आहे. आजच्या काळात हे असं प्रेम आणि सहकार्याने कुटुंब बांधून ठेवणं फार अवघड आहे. अनेक कठीण प्रसंगात एजींनी वहिनींच्या सोबत धीराने सगळ्या कुटुंबाला बाहेर काढलयं. त्यांच्या दोन मुलांनी-स्नेहा आणि आशिष- यांनी वडिलांचे उत्तम गुण घेवून प्रगती केली आहे.

अलिकडेच म्हणजे १६ मे रोजी त्यांच्या वडिलांचं दु:खद निधन झालं. खरं तर ३१ मे रोजी निवृत्त होताना वडिलांनी सोबत असावं ही त्यांची इच्छा होती. पण ती अपूर्णच राहिली. एजींनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने वडिलांचा अतिशय वात्सल्याने सांभाळ केला ही महत्वाची गोष्ट.

एजी सर, आता निवृत्तीनंतरचं आयुष्य मस्त मजेत जगा. आता तूम्हाला आजपर्यंत करता न आलेल्या गोष्टी करण्याची संधी आहे. मस्त, मनमुक्त कविता लिहा, क्रिकेट बघा, खूप फिरा आणि हो वेगळ्या, आवडीच्या विषयावर लिहा. आम्हाला सगळ्यांना तूमचं शिक्षणात योगदान हवं आहे. आपण पुन्हा कवितेच्या मैफिली जमवू आणि मंतरलेले क्षणं पून्हा अनूभवत राहू. आणि हो, तेवढं कवितांचं पूस्तक प्रकाशित करायचं विसरु नका.
एजी सर, तूम्हाला सेवा निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी भरुभरुन, मन:पूर्वक शुभेच्छा! ही दुसरी इनिंग आहे, मस्त घालवा.

आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभकामना!!

– आनंद कुलकर्णी, नारायणगांव.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button