breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुलाचा तीनवेळा पराभव, बापाचं डोळ्यात पाणी आणणारं भाषण, सभेला जमलेले लोकही स्तब्ध

अहमदनगर: माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी सुपूत्र प्रतापराव ढाकणे यांचा एका कार्यक्रमात स्वत:च्या हाताने हार घालून सत्कार केला. ‘तीन वेळा प्रतापचा सलग पराभव झाला, पण हार पचवायला ताकद लागते’, असं म्हणत बबनराव ढाकणे यांनी मुलाचं कौतुक केलं. बापाला आपल्याबाबत कौतुकोद्गार काढताना पाहून प्रतापरावांना गहिवरुन आलं आणि ते मंचावरच ढसाढसा रडायला लागले. ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्या जीवन कार्यावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज अहमदनगरमधील बोधेगाव येथे पार पडले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही या कार्यक्रमाला दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले होते. . त्यासोबत हजारोंच्या संख्येने नागरिकांनीही या कार्यक्रमात गर्दी केली होती.

बबनराव ढाकणे म्हणाले, “एक गोष्ट मला वाईट वाटते, मी अनेकांचा मित्र राहिलो, रस्ताभर फिरत राहिलो. पण कुटुंबाकडे मी दुर्लक्ष केलं. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. नातेवाई, मित्र, मुलं, नातवांचा माझ्यावर राग आहे. एवढं सगळं केलं आणि आम्ही कोण आहोत असं झालं. आता प्रतापच्याही जीवनात तोच संघर्ष आला आहे. पण, त्या संघर्षाला तो कंटाळला नाही. तीनवेळा सलग पराभव झाला. सत्ता वगैरे काही नाही, सत्ता ही महत्त्वाची नव्हती. त्याच्याही पुढे संघर्ष आलाय, तुमच्या जीवावर उलटणार तो जोपर्यंत तुमची ताकद आहे तोपर्यंत, त्याचा कितीही वेळा पराभव होऊ द्या. मी कधी माझ्या मुलाबाळांना जवळ घेतलं नाही. पण, आज त्याने चांगलं काम केलं. म्हणून मी हार घालून माझ्या मुलाचा सत्कार तुमच्यादेखत करणार आहे. अपयश पचवणं फार कठीण असतं. वेडा होतो माणूस. पण मी त्याला सांगू इच्छितो की तुम्हा आम्हाला जी ताकद दिली आहे ती जनता-जनार्दनाने दिलेली आहे. पराभव पचवण्यातच सत्ता आहे”. यावेळी शरद पवार म्हणाले, “ढाकणे पितापुत्रांच्या मागे इथल्या जनतेने ठामपणे उभं राहण्याची गरज आहे, त्यांच्या संघर्षाला साथ द्या”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button