breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ”; विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबई |

विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्यांसह विविध मुद्यांवर राजभवन विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचा नवा अध्याय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्यावरून सुरू झाला आहे. राज्यपालांच्या नियोजित परभणी, हिंगोली व नांदेड दौऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठका व वसतिगृहांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असून दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

“संविधानाप्रमाणे हे सगळे अधिकार राज्यपालांचे आहेत. राज्यपाल हे प्रमुख आहेत आणि संविधानाने त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला सल्ला देण्यासाठी त्याठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामुळे राज्यपालांना दौरे करु नका असं कोणी सांगू शकत नाही. पीसी अलेक्झांडर किंवा राज्यपाल जमीर यांनी तर महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्याचा दौरा केला आहे. मग त्यावेळी हे विषय का आले नाहीत. हे राज्यपाल प्रामाणिकपणे आपलं काम करतायतं त्यामुळे काही लोकांना मळमळ होतेय. ती मळमळ याप्रकारे बाहेर निघतीय त्या लोकांना माझा सल्ला आहे. त्यांनी भारतीय संविधानाचं वाचन करावं आणि त्यानंतर अशी वक्तव्य करावी,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल कोश्यारी हे नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्य़ांचा तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये सरकारच्या अधिकारांचा भंग होत असल्याचा विषय अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला होता. नांदेडमध्ये राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने बांधलेली दोन वसतिगृहे आहेत. त्यांचे पैसे राज्य सरकारने दिले. बांधकाम पूर्ण झाले असून अजून ते विद्यापीठाकडे हस्तांतरित झालेले नाही. त्याचे उद्घाटन करून नंतर विद्यापीठाकडे देणे हा अधिकार राज्य सरकारचा आहे. राज्यपाल कुलपती असल्याने व्यवस्थापनाबाबत त्यांचा अधिकार आहे. पण सरकारने केलेली कामे राज्य सरकारला न विचारता थेट कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही अशी नाराजी मलिक यांनी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्य़ांमधील पूरग्रस्त भागांना भाजप आमदार आशिष शेलार यांना बरोबर घेऊन दौरा केला होता. त्याबद्दलही टीका झाली होती. “कोश्यारी यांच्याकडून वारंवार सरकारच्या कामात हस्तक्षेप होत आहे. ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना आपण अजूनही मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत याचा त्यांना विसर पडलाय का?” असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button