breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“…तर राज्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही”, विजय वडेट्टीवार यांनी दिला गंभीर इशारा!

मुंबई |

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील करोनावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा दिला आहे. तसेच लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असंही नमूद केलं. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, “वेळीच नियंत्रण मिळवलं नाही, तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये करोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. करोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे हे नियंत्रण लोकांच्या हातात आहे. आपण कसं राहायचं, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचं आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.”

  • “लॉकडाऊन कधी करायचा हा निर्णय मुख्यमंत्री घेतील”

“मागील वेळी रेल्वे, विद्यार्थी किंवा इतर जे काही निर्बंध लावले होते त्या सर्व गोष्टींचा विचार करता आता लॉकडाऊनची स्थिती येते आहे. हा लॉकडाऊन कधी करायचा हा निर्णय मुख्यमंत्री घेतील,” असंही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

  • चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध येणार? शाळाही होणार बंद?

दरम्यान, राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी (३१ डिसेंबर) मध्यरात्रीपासूनच निर्बंध लागू केले आहेत. यामुळे कार्यक्रमांसाठी एकत्र जमणाऱ्या लोकांची मर्यादा ५० करण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी देखील २० लोकांचं बंधन घालण्यात आलं आहे. सध्या काही मोजक्याच गोष्टींवर निर्बंध घातले असले तरी या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृह यांच्यावरील संभाव्य निर्बंधांवर देखील खल झाला. तसेच, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास लॉकडाऊनच्या पर्यायावर देखील चर्चा झाली.

  • आजपासून काय असतील निर्बंध?

राज्य सरकारने गुरुवारी रात्री उशिरा नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातील विवाह सोहळय़ांमध्ये फक्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. ही संख्या खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असेल. तसेच, अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. चौपाट्या, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने चौपाट्या, समुद्रकिनारे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • पुन्हा लॉकडाऊन?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्याविषयी अद्याप राज्य सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, करोनाची लाट रोखण्यासाठी अधिक कठोर निर्बंध किंवा प्रसंगी लॉकडाऊनचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत. मात्र लॉकडाऊन करताना शहर किंवा जिल्हयातील उपलब्ध खाटा आणि ऑक्सिजनची गरज याचा विचार करून निर्णय घेताल जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • उपहारगृहे, मॉल्सबाबत काय निर्णय?

दरम्यान, यावेळी राज्यातील उपहारगृहे, मॉल्स, हॉटेल्स, शाळा याविषयी देखील बैठकीत खल झाला. उपाहारगृहांमध्ये सध्या ५० टक्क्यांच्या क्षमतेला परवानगी असली तरी बहुतांशी उपाहारगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. उपाहारगृहांची तपासणी करण्याची पुरेशी यंत्रणा देखील पोलिसांकडे नाही. त्यामुळे यावर निर्बंध आणण्याची भूमिका यावेळी पोलिसांकडून मांडण्यात आली. पण यावर अद्याप काही निर्णय झालेला नाही. मात्र, करोनाचा उद्रेक वाढल्यास चित्रपटगृहे, मॉल, नाट्यगृह यांच्यावरही निर्बंध लागू करावे लागतील, अशी चर्चा बैठकीत झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button