breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“…तर मी मंत्रीपदावर थुंकतो, असं म्हणून एकही मंत्री बाहेर पडला नाही”, संभाजी भिडेंची ठाकरे सरकारवर आगपाखड!

पुणे |

राज्यात सुपर मार्केटमध्ये देखील वाईनची विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपानं या निर्णयाला विरोध केला असताना आता शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारचं हे पाऊल सर्वनाशाच्या दिशेने पडलं आहे, असं म्हणथ संभाजी भिडे यांनी या निर्णयाविरोधात उभं राहण्याचा मानस बोलून दाखवला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार लालबहादूर शास्त्रींसारखा आहे, असं सांगत त्यांनी मोदींवर स्तुतिसुमनं देखील उधळली!

  • “..ही दुर्दैवाची गोष्ट”

“जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा एकसुद्धा मंत्री, आमदार ‘असा निर्णय करणार असेल तर मी आमदारकीवर, मंत्रीपदावर थुंकतो, तुमच्यात बसण्याचं पाप मी करणार नाही’, असं म्हणून बाहेर पडला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धान्य कुजवून त्याच्यापासून दारू तयार करा असं सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात. आम्हाला राग येत नाही, संताप येत नाही”, असं संभाजी भिडे म्हणाले. सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  • “त्यांनी जन्म घेतलेल्या आई-बापाची कूस बाटवली”

“समाज काही ऐकत नाही, लोक काही सुधारत नाहीत, लोक काही प्रतिसाद देत नाहीत असं बोलायचं नाही. समाजाला आपण दिशा द्यायची असते. आपण जगून दाखवायचं असतं. ज्या लोकशाहीनियुक्त राज्यकर्त्यांवर पुढच्या पिढ्यांना प्रकाश दाखवण्याची जबाबदारी आहे, त्यांनी असा बेशरम, राष्ट्रघातक, धर्मघातक, नीतीघातक, सर्वनाशक निर्णय घेऊन मोठं पाप केलं आहे. त्यांनी त्यांचं कुळ आणि जन्म घेतलेल्या आई-बापांची कूस बाटवलेली आहे. हे थांबलंच पाहिजे”, अशा शब्दांत संभाजी भिडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

  • “पंतप्रधानांनी देशात दारूबंदी करावी”

दरम्यान, यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दारूबंदी करावी, अशी मागणी केली आहे. “मी कोश्यारींना म्हणणार आहे की हे मंत्रीमंडळ बरखास्त करून टाका. तुमचा अधिकार आहे तो. नरेंद्र मोदी सरकार खरोखर भगवंताची कृपा म्हणून मिळालं आहे आपल्याला. अतुलनीय. लालबहादूर शास्त्री जसे चांगले होते, तसेच हे आहेत. मी पंतप्रधानांचं मन जाणतो. त्यांनी खरोखर या देशातल्या दारूला कायमची तिलांजली देणारा ठराव लोकसभेत करून घटनेत दुरुस्ती करावी”, असं संभाजी भिडे यावेळी म्हणाले.

  • मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा?

“एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने, एक पाऊल प्रगतीच्या दिशेने.. पण हे पहिलं पाऊल सर्वनाशाच्या दिशेने पडलेलं आहे. या देशातली दारू संपली पाहिजे १०० टक्के. आपण दारूचा जर अशा पद्धतीने मुक्तसंचार होऊ देत असू, तर गांजाची शेती करण्याला आपण का आडवं जायचं? सर्रासपणे अफू, गांजाची शेती करून आपला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापारातून पैसा मिळवू शकेल. हेसुद्धा करायला हरकत नाही असं म्हणणारा बेशरम समाज निर्माण होतोय. पण ते जमणार नाही. त्याच्याविरोधात आम्ही उभे राहणार आहोत”, असं ते म्हणाले.

  • आर. आर. आबा असते तर…

यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी दिवंगत आर. आर. आबा यांची आठवण काढली. “मला आठवण होते आर. आर. आबांची. डान्सबारचा मुद्दा होता. त्यांनी मंत्रीमंडळात सगळ्यांच्या विरोधात जाऊन डान्सबार बंदी केली. आज आर आर आबा असते, तर सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय होऊ दिला नसता. यातून नेमकं काय साधायचंय ते नेमकं कळत नाहीये. असे निर्णय झाल्यानंतर कुणाला राग येत नाहीये”, असं संभाजी भिडे म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button